मुंबई - गोवंडीतील रेल्वे स्टेशन रस्त्यावरील राम मंदिर बंद केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार तुकाराम काते यांनी मंदिरासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. तर भाजपकडून मंदिराची महाआरती करून बंद केलेले मुख्यद्वार उघडण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंबईतील गोवंडी परिसरातील राम मंदिराला गेल्या काही दिवसांपासून जागा मालक असलेल्या बीपीटी कंपनीने कुलूप लावले होते. यावर शिवसेनेचे माजी आमदार तुकाराम काते यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर पाठीमागील द्वार उघडण्यात आले. मात्र, मुख्य रस्त्यावरील द्वार काढून या ठिकाणी भिंत बांधली आहे. ही भिंत जोपर्यंत काढली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार, असा इशारा तुकाराम काते यांनी दिला आहे. काते यांनी आज (सोमवारी) उपोषण सुरू केल्यानंतर भाजपकडूनही मंदिरात महाआरती करण्यात आली.
हेही वाचा - लंगोट न नेसलेल्याला तुम्ही गदा दिली - अजित पवार
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी याठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. गोवंडीतील ही जागा मुबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीची आहे. या जागेवर गेल्या 50 वर्षांपासून राम मंदिर आहे. त्याचबरोबर या मंदिराच्या पाठीमागे एक मशीदसुद्धा आहे. ही जागा विकण्यात येणार असल्याने या ठिकाणचे मंदिर आणि मशीद तोडण्यात येईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे हे मंदिर आणि मशीद या ठिकाणीच असले पाहिजे, अशी मागणी आता जोर धरत आहे.