मुंबई - शिवसेनेने आज (रविवारी) त्यांच्या सामना या मुखपत्रातून राज ठाकरे यांना साद घातली आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेने आतापर्यंत कधीही मनसेला साथ दिली नाही. पाकिस्तानी कलाकारांचा विषय असो की परप्रांतीय फेरीवाल्यांचा विषय असो. उत्तर प्रदेश, बिहारचे खासदार संसदेत राज ठाकरे यांच्या विरोधात भूमिका मांडत असताना शिवसेनेचे संजय राऊत किंवा सेनेच्या एकाही खासदाराने त्याला विरोध केला नाही. म्हणून ठाकरे ब्रँड टिकवण्याचे काम, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेच चालवत आहेत, असे मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले आहेत. तसेच या शिवसेनेच्या अग्रलेखाबाबत तेच हे अधिकृत भूमिका मांडतील, असेही देशपांडे म्हणाले.
ते म्हणाले, सेनेने रातोरात आमचे सहा नगरसेवक फोडले. यावरून सेनेने कधीही मनसेला आपले मानलं नसल्याचे स्पष्ट होते. बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसा राज ठाकरेच चालवत आहेत, असेही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
शिवसेनेने 'सामना'त काय म्हटले?
'ठाकरे' ब्रॅण्ड हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे आणि दुसरा ब्रॅण्ड 'पवार' नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डना नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा, असे कारस्थान सध्या सुरू असून ते उघडे पडले आहे. त्यामुळे मराठी माणसाने एक होणे गरजेचे असल्याचे असे सांगत शिवसेनेने मनसेला साद घातली.
राज ठाकरे हे सुद्धा 'ठाकरे' ब्रॅण्डचे एक घटक आहेत आणि या सगळ्या वादाचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेसोबत मनसेचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात 'ठाकरे' ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्यादिवशी 'ठाकरे' ब्रॅण्डचे पतन होईल, त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, यामुळे मुंबई, महाराष्ट्रासाठी 'ठाकरे' ब्रॅण्ड टिकला पाहिजे, असे आवाहन शिवसेनेने केले आहे. पक्षाचे मुखपत्र 'सामना'तून रोखठोक या सदरात खासदार संजय राऊत यांनी याबाबत मत व्यक्त केले आहे.