मुंबई - लॉकडाऊनचा फायदा घेत मुंबईत मोटरमन ट्रेनिंग सेंटर, कुर्ला यांनी ऑनलाईन प्रशिक्षणद्वारे मोटरमन आणि गार्ड्सना वेगवेगळ्या नियमांविषयी रिफ्रेश केले आहे. या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात मोटरमन आणि गार्ड यांचे ज्ञान अद्ययावत करण्यात आले.
एसपीएडी (सिग्नल पासिंग एट डेंजर) आणि प्लॅटफॉर्म ओव्हरशूटिंग टाळण्यासाठी प्रशिक्षण दिले गेले. आगामी पावसाळ्यात गाडी चालवण्याबाबत खबरदारीसाठी त्यांना तयार केले. लाखो प्रवाशांना सुरक्षितपणे नेण्याची जबाबदारी पार पाडताना मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागातील कर्तव्यावरील प्रत्येक मोटरमन दररोज सरासरी 300 सिग्नलवर लक्ष देत असतो. म्हणूनच, लोकल रेल्वेच्या कामकाजाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अधूनमधून प्रशिक्षण आणि ज्ञान अद्ययावत करणे अत्यंत आवश्यक आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी केल्यामुळे मुंबई उपनगरी सेवा बंद करण्यात आल्या. लॉकडाऊनच्या आधी मोटरमन ट्रेनिंग सेंटरमध्ये वर्गात प्रशिक्षण दिले जात होते. लॉकडाउननंतर दिशानिर्देशांनुसार उपनगरीय मोटरमन आणि गार्ड्ससाठी वर्गातून प्रशिक्षण घेण्याची पद्धत बदलून ऑनलाईन करण्यात आले. 21 दिवसांचा रीफ्रेशर ट्रेनिंग कोर्स, 10 आठवड्यांचा प्रमोशनल कोर्स, एक दिवसाचा इंटेन्सिव्ह कोर्स असे तीन अभ्यासक्रम ऑनलाईन घेण्यात आले.
प्रत्येक अभ्यासक्रमातील मोड्यूलमध्ये ऑनलाइन वर्ग प्रशिक्षण तसेच प्रॅक्टिकल प्रशिक्षण आहे. प्रॅक्टिकल प्रशिक्षण लोकल ट्रेनमध्ये एकावेळी तीन मोटरमनच्या बॅचसाठी दिले जाते. 8 मे 13 मे या कालावधीत 162 प्रशिक्षणार्थींना एक दिवसीय इंटेन्सिव्ह कोर्स प्रशिक्षण देण्यात आले. तर, दररोज 10 प्रशिक्षणार्थी घरून ऑनलाइन प्रशिक्षण वर्गात सहभागी होतात आणि इतर ऑनलाईन अभ्यासक्रमांत 85 कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. या लॉकडाऊन कालावधीत एकूण 247 मोटरमनने प्रशिक्षण घेतले आहे.
मोटरमन आणि गार्ड दररोज मुंबईची लाईफलाईन असलेली उपनगरी रेल्वे गाडी चालवतात. प्रशिक्षण कार्यक्रमाचे हे ऑनलाईन मॉड्यूल मुंबई विभागातील विविध प्रकारच्या रेकच्या सर्व तांत्रिक आणि समस्या-निवारणाचे ज्ञान, ऑपरेटिंग तांत्रिक ज्ञान, संरक्षाबाबत माहिती, मार्गाचे ज्ञान, प्लॅटफॉर्म ओव्हरशूटिंग आणि आगामी मान्सूनची खबरदारी आणि एसपीएडी (सिग्नल पासिंग अट डेंजर) टाळण्यासाठी टिप्स देऊन मोटरमनना अद्ययावत करते. ऑनलाईन प्रशिक्षणात पुन्हा एकदा फ्लॅश लाईट, हेड लाइट वापर, डिटोनेटरचा वापर, स्वयंचलित सिग्नलिंग सेक्शन व अबसोल्यूट ब्लॉक विभागाचे ज्ञान यासह सुरक्षिततेच्या तांत्रिक ज्ञानाच्या व्यापक बाबीबद्दल त्यांचे प्रबोधन करण्यात येते. ईएमयूमध्ये आग लागल्यास, गाडी चालवताना रन ओव्हर झाल्यास आणि धावणाऱ्या गाडीमधून प्रवासी खाली पडल्यास करण्यात येणारी कारवाई, सहाय्यक चेतावणी प्रणाली वेगवेगळ्या प्रकारच्या रेल्वे गाडीचे (रॅक) समस्या निवारण तसेच रेल्वेच्या कामकाजाच्या सिग्नलिंग व तांत्रिक बाबींचे ज्ञान तपासण्यासाठी शेवटी प्रशिक्षणार्थींच्या ऑनलाईन चाचण्यादेखील घेण्यात आल्या आहेत.
हे रिफ्रेशर कोर्सेस आणि प्रशिक्षण त्यांना सुरक्षा, तांत्रिक बाबींविषयी अद्ययावत माहिती ठेवण्यास आणि ट्रेनच्या सुरक्षित ऑपरेशनसाठी सक्षम करण्यास आणि उपनगरी विभागातील सिग्नलचे स्थान लक्षात ठेवण्यास मदत करतील. मुंबईच्या उपनगरी रेल्वे गाड्यांसह, भारताच्या आर्थिक राजधानीची जीवनरेखा देशव्यापी लॉकडाऊनमुळे बंद झाली, त्याचा उपयोग करून मध्य रेल्वेने आपल्या मोटरमन आणि गार्ड्सचे ज्ञान अद्ययावत करण्याचे अभूतपूर्व कार्य पूर्ण केले आहे.