मुंबई - मुंबईत कोरोनाचे नवे 1 हजार 395 रुग्ण आढळून आले असून 79 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 58 हजार 135 वर, तर मृतांचा आकडा 2 हजार 190 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आतापार्यंत 26 हजार 986 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने सध्या 28 हजार 959 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. त्यात आज काही प्रमाणात घट दिसून आली आहे. मुंबईत आज 79 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 59 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 55 पुरुष आणि 24 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 4 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 42 जणांचे वय 60 वर्षावर, तर 33 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते.
मुंबईमधून आज 1 हजार 39 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 26 हजार 986 वर पोहोचला आहे. मुंबईत 13 जून रोजी कोरोनाच्या 4 हजार 540 चाचण्या करण्यात आल्या होत्या. मुंबईत 13 जूनपर्यंत 2 लाख 57 हजार 274 चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत 7 ते 13 जून या आठवड्यात कोरोनाचे रुग्ण वाढीचा दर 3 टक्के असून रुग्ण बरे होण्याचा दर 46 टक्के इतका झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.