मुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी पाचव्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आता तत्कालीन कांदिवली क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक करण्यात आली आहे.
मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर मनसुखच्या पत्नीने माध्यमांसमोर सांगितलं होतं की, कांदिवली पोलिसातून एका तावडे नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता.
सुनील माने सध्या सशस्त्र पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांना मनसुख हिरेन मृृृत्यू प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात तीन जण पोलीस दलातील आहेत.
प्रदीप शर्मा यांचीही चौकशी -
मुकेश अंबानी यांच्या ॲन्टिलिया इमारतीबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर या संदर्भात तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची तब्बल 3 तास चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, एनआयएकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून एकेकाळी मुंबईत पोलीस खात्यात नावाजलेल्या प्रदीप शर्मा या माजी पोलीस अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे