मुंबई - टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसाच्या विशेष पथकाने सोमवारी आणखी एका आरोपीला उत्तर प्रदेश येथून अटक केली. विनय त्रिपाठी (वय ३२) असे या आरोपीचे नाव असून तो हंसा रिसर्च ग्रुप कंपनीचा माजी कर्मचारी आहे. या प्रकरणात आता अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या पाच अशी झाली आहे.
टेलिव्हिजन वाहिन्यांच्या टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून खुलासा करण्यात आल्यानंतर या प्रकरणी पाचव्या आरोपीला, उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर येथून अटक करण्यात आली. हंसा रिसर्च ग्रुप कंपनीचा माजी कर्मचारी विनय त्रिपाटी याला मुंबई पोलिसांनी मिर्झापूर येथून अटक केली. हंसा रिसर्च ग्रुपमध्ये काम करत असताना, विनय त्रिपाठीने टीआरपीशी छेडछाड केला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्याला अटक करण्यात आलेली आहे. 2018 मध्ये विनय त्रिपाठीने हंसा ग्रुप मधून नोकरी सोडली आहे.
दरम्यान, आतापर्यंत टीआरपी घोटाळ्यासंदर्भात पोलिसांकडून तपास केला जात असताना हंसा रिसर्च ग्रुपचे सीईओ प्रवीण निझार यांची स्टेटमेंट मुंबई पोलिसांनी नोंदवून घेतलेली आहे. हंसाचे डेप्युटी मॅनेजर नितीन देवकर यांची स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेली आहे. याशिवाय काही कागदपत्रांची मागणी हंसा ग्रुपकडे पोलिसांनी केली आहे. या बरोबरच रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे डिस्ट्रीब्यूटर घनश्याम सिंग, सीईओ विकास खानचंदानी यांना सुद्धा कागदपत्रांसह मुंबई पोलिसांनी चौकशी बोलावले होते. मात्र हे दोघेही मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी अद्याप हजर झालेले नाहीत.
हेही वाचा - मुंबईत वीज पुरवठा खंडित; उद्योग क्षेत्राला ६०० कोटीच्या नुकसानीचा अंदाज, तज्ज्ञ म्हणाले..
हेही वाचा - वाघदेव पावला..! मुख्यमंत्री ठाकरे शब्दाला जागले, आरे आदिवासी पाड्यांमध्ये जल्लोष