मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी कामराण याला मुंबईतून एटीएसने अटक केली. त्याचा ट्रांजिस्ट रिमांड उत्तर प्रदेश पोलिसांकडे 24 मे रोजी देण्यात आला. आता या आरोपीला सोडून द्या अन्यथा परिणामांना सामोर जा, असा धमकी देणारा कॉल उत्तर प्रदेश पोलिसांच्या सायबर डेस्कवर पुन्हा आला.
यासंदर्भात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला माहिती देण्यात आली होती. यानंतर एटीएस पथकाच्या नाशिक युनिटने सैयद मोहम्मद फैसल अब्दुल वहाब (वय 20) या आरोपीला नाशिकमधून अटक केली आहे. योगी आदित्यनाथ यांना मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केल्यानंतरही आरोपीला सोडून देण्यासाठी धमकीचे फोन येत असल्याने या मागे कुठला गट काम करत आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
धमकी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कामराण याला रविवारी न्यायालयात हजर केले. 28 मेपर्यंत त्याची रवानगी ट्रांजिस्ट रिमांडमध्ये करण्यात आली असून त्याचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतला आहे.