मुंबई - शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जाणाऱ्या कफ परेडच्या रहिवासी संघाच्या सेक्रेटरी पदावर असणाऱ्या पद्माकर नांदेकर (वय ५२) याला एका १९ वर्षीय ब्राझिलियन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
पद्माकर नांदेकर हा आंतराष्ट्रीय सेवाभावी संस्था रोटरी क्लबचा सदस्य असून मुंबईत येणाऱ्या परदेशी नागरिकांना राहण्याची व्यवस्था करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून करीत होता. ६ महिन्यांपूर्वी ब्राझिलमधून कामानिमित्त मुंबईत आलेल्या पीडित १९ वर्षीय ब्राझिलीयन तरुणीला राहण्यासाठी पद्माकर याने आपल्या घरातील खोली दिली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी ही तरुणी बांद्रा येथे राहण्यास आली होती. यानंतर या आरोपीने कुलाबा परिसरात आयोजित केलेल्या एका हायप्रोफाईल पार्टीत या तरुणीला बोलावून तिला मद्यातून गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचे या तरुणीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.
हायप्रोफाईल व्यक्तींसोबत संबंध असलेला आरोपी पद्माकर नांदेकर याचे पोलीस खात्यातही मोठ्या अधिकाऱ्यांशी संबंध असल्याने याबद्दल पोलीस अधिकारी अधिक बोलण्यास तयार नाहीत. मात्र, कफ परेड पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून लैंगिक शोषणाचा गुन्हा नोंदवत या आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीची २४ मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.