मुंबई : बनावट सरकारी कागदपत्रे, ओळखपत्र बनवून पाठवणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी विविध कारणांनी 14 लाख 36 हजार रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
14 लाख 36 हजार रुपयांची फसवणूक - ८ जानेवारी ते ९ जानेवारीदरम्यान आरोपींनी फेडेक्स कुरीयर कंपनीकडून बोलत असल्याची बतावणी केली होती. तसेच मुंबई पोलीस अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादीचे बेकायदेशीर कुरीयरचे प्रकरण त्यांच्याकडे तपासाकरिता असल्याचे खोटे सांगितले होते. तसेच फिर्यादीस पोलीस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र पाठवून, हा गुन्हा हा मनी लॉंडरींगचा (Money Laundering) असल्याने सीबीआयमार्फत चौकशी सुरू असल्याची बतावणी केली होती. त्यासंबंधी सीबीआयची बनावट सरकारी करारपत्रे फिर्यादीस पाठवून १४ लाख ३६ हजार पाठविण्यास भाग पाडून फसवणुक केली होती.
आरोपीस अटक - तक्रारदारांनी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यास संपर्क साधला असता फसवणूक झालेल्या रकमेपैकी १३ लाख ९८ हजार रुपये गोठवण्यात आले. १० जानेवारीला या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आली असून या आरोपीकडून एकूण ४३ सिम कार्ड जप्त करण्यात आली आहेत. तसेच या आरोपीकडे अधिक तांत्रिक तपास चालू आहे.
अलीकडेच पॉलिसी धारकाला कॉल करून इन्शुरन्स पॉलिसी बाबत अधिक पैसे मिळवून देण्याचे आमीष दाखवून पैसे लुटणाऱ्या दोघांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली होती. याप्रकरणी ११ लाख १८ हजार ५५० रुपयांची फसवणूक केलेल्या सायबर चोरट्यांना पूर्व प्रादेशिक सायबर गुन्हे शाखेने सापळा रचून बेड्या ठोकल्या होत्या. आरोपींची नावे भरत सिंह सुरेंद्र सिंह रावत (वय 29 वर्षे) आणि कमल कुमार गिरी चंद्र पाल (वय 30 वर्षे) अशी आहेत. भरत सिंह हा दिल्लीतील कलावल नगर येथे कॉल सेंटरमध्ये नोकरी करतो. तर कमल कुमार हा दिल्लीत राहणारा असून इव्हेंट मॅनेजमेंटचा धंदा करतो. या गुन्ह्याचा तपास अधिकारी पोलीस निरीक्षक वैशाली श्रावगी यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींचा माग काढला.
हेही वाचा - Ahmedabad Crime: पतीने पत्नीचा गळा चिरुन घराला लावली आग, अहमदाबादच्या गोदरेज गार्डन परिसरात दहशत