मुंबई - गृहनिर्माण सोसायटीच्या बैठकीत झालेल्या वादाचा राग मनात धरून एका महिलेचा संपर्क क्रमांक आणि फोटो एका अश्लील संकेतस्थळावर अपलोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका आरोपीला अटक केली आहे. अल्पेश वल्लभदास पारेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गृहनिर्माण सोसायटीच्या बैठकीत आरोपी अल्पेश याचा पीडित 37 वर्षीय महिलेशी वाद झाला होता. त्याचा राग मनात धरत आरोपीने एका अश्लील संकेतस्थळावर पीडितेचे फोटो आणि मोबाईल नंबर अपलोड केले. तेव्हा काही दिवसांपासून पीडितेच्या मोबाईलवर वेगवेगळ्या क्रमांकावरून शरीर संबंध ठेवण्यासाठी रात्री अपरात्री फोन येऊ लागले.
पीडित महिलेने सुरुवातीला या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. मात्र, सतत येणारे फोन कॉल, व्हॉट्सअॅपवर लैंगिक सुख व रिलेशनशिप ठेवण्यासाठी येणाऱ्या मेसेजमुळे त्रासून पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेव्हा तपासाअंती अल्पेशने हे कृत केल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित महिला मालाड परिसरात राहत असून ती एका बँकेत काम करते.