मुंबई- बिबट्याच्या कातड्याच्या तस्करी करण्यासाठी आलेल्या वयोवृद्धाला खेरवाडी पोलिसींनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मनोज श्रीधर बडवे ( ६१ वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. बाजारात या बिबट्याच्या कातडीची किंमत सुमारे २२ लाख रुपये आहे.
पोलिसांची पाळत
वांद्रे येथील बीकेसी, कलानगरजवळील बीएमसी कॉलनीजवळ काहीजण बिबट्याच्या कातड्यांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकुंबे यांच्या पथकातील पोलीस कर्माचाऱ्यांनी घटनस्थळी साध्या वेशात पाळत ठेवली होती.
२२ लाख रुपये किंमत
काही वेळानंतर तिथे एक वयोवृद्ध संशयास्पदरीत्या फिरत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यामुळे त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडील प्लास्टिक पिशवीची झडती घेतल्यानंतर त्यात पोलिसांना एक बिबट्याचे कातडे आढळून आले. ४६ इंच लांबी आणि १९ इंच रुदी असलेल्या या कातड्याची किंमत सुमारे २२ लाख रुपये आहे. तपासात मनोज हा दादर येथील भवानी शंकर रोड, समृद्धी सोसायटीमध्ये राहत असून त्याने कातडे तिथे विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.
आरोपीला पोलीस कोठडी
आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. न्यायलायाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.