मुंबई - अनोळखी व्यक्तीसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यास त्याचा गैरवापर कशा प्रकारे होतो, याचे उदाहरण मुंबईत पहायला मिळाले आहे. मुंबईमधील एक आरोपी सोशल माध्यमांवर तरुणींशी मैत्री करून त्यांचे व्हॉट्सअॅपवरील फोटो फोटोशॉपच्या सहाय्याने अश्लील बनवत होता. तसेच ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तरुणींना देत खंडणी मागत होता. विशेष म्हणजे हा आरोपी १० वी नापास आहे. या आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
आरोपी मागील काही महिन्यांपासून तरुणींना चित्रपट, सिरियल्समध्ये काम मिळवून देतो, असे सांगून ब्लॅकमेल करत होता. तसेच हा आरोपी आपण कास्टिंग डायरेक्टर असल्याचे सांगत होता.
सिद्धार्थ सरोदे (२९) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चेंबूरच्या सुमन नगर परिसरात राहणारा हा आरोपी वर्तमानपत्रामध्ये सिनेमात आणि मालिकांमध्ये काम करण्यास मुली पाहिजेत, अशी जाहिरात देत होता. त्याच्या या जाहिरातीला बळी पडून अनेक तरुण मुली त्याच्या संपर्कात आल्या होत्या. आरोपीने आतापर्यंत ७ ते ८ मुलींचे फोटो अश्लील पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. याप्रकरणी आरोपीवर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी विष्णू नगर, ठाणे, नवघर, मुलुंड पोलीस सिद्धार्थचा शोध घेत होते.
आरोपी सिद्धार्थ सरोदे याने वर्सोवा येथे राहणाऱ्या एका तरुणीचे बनावट अश्लील फोटो बनवून तिच्या व्हॉट्सअपवर पाठवून १ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तर पैसे न दिल्यास सदरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे याप्रकरणी पीडित महिलेने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांनी आरोपीच्या सोशल माध्यमाच्या अंकाऊटच्या माहितीवरुन त्याला चेंबूरमधून अटक केली.