मुंबई - कर्नाटक राज्यातील ओल्ड हुबळी पोलीस ठाणे धारवाड हद्दीत 6 ऑगस्ट रोजी रियल इस्टेस्ट व्यवसायिक इरफान अल्लाबक्ष हंचनाल (वय 45 वर्षे) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याबाबत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 12 ने राजेंद्र मोहनसिंग रावत उर्फ राजू नेपाळी (वय 38 वर्षे) याला अटक केली आहे.
याप्रकरणी यापूर्वी हुबळी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. मात्र, ही हत्या ही मैसूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला युसूफ सुलेमान कादरी उर्फ युसूफ बचकाना याने त्याच्या कर्नाटक व मुंबईतील हस्तकांमार्फत घडवून आणलेली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे युनिट 12 कडून मुंबईतील हस्तकाचा शोध घेतला जात होता. दरम्यान, पोलिसांना गँगस्टर युसूफ बचकाना याने त्याचा मुंबईतला हस्तक राजेंद्र मोहनसिंग रावत याला सतत फोन केल्याचे आढळून आले.
पोलिसांनी 24 ऑगस्टला देवला पाडा, बोरिवली पूर्व येथे सापळा रचून आरोपीला अटक केली. पोलीस तपासात आरोपीने त्याच्या गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली. मृत इरफानची हत्या करण्यासाठी शूटरचा बंदोबस्त करण्यास सुरुवातीला 3 लाख व खून झाल्यानंतर 1 लाख देण्याचे ठरवले होते, अशी माहितीही आरोपी रावतने दिली. अटक आरोपी राजेंद्र रावत हा अभिलेखावरील आरोपी असून युसूफ बचकाना याच्या टोळीसाठी त्याने 2013 साली एका बांधकाम व्यावसायिकाच्या गाडीवर गोळीबार घडवून आणल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल असल्याचे पोलीस तापासत समोर आले आहे.
हेही वाचा - चिंताजनक : एकाच दिवशी विवाहिता बेपत्ता, तर दोन अल्पवयीन मुली गेल्या पळून