मुंबई - आज पहिला श्रावणी सोमवार तसेच नागपंचमी असा दुग्ध शर्करा योग् आहे. त्यामुळे मुंबईच्या बाबूलनाथ मंदिरात पहाटेपासून शेकडो भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. पहाटे प्रकाल पूजा, रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर सहा वाजता आरती झाली. त्यानंतर भाविकांसाठी मंदिराचा गाभारा खुला करण्यात आला.
श्रावण मासात व्रत वैकल्य आणि धार्मिक पूजा पाठाचा उत्सव केला जातो. या महिन्यात महादेवाचे भक्त महादेवाला उपासवारी करत असतात. आजपासून श्रावण महिन्याला सुरवात झाली आहे. पवित्र मानला जाणाऱ्या श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार आहे. त्यामुळे शिवभक्तांनी मुंबईतील बाबुलनाथमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. दरवर्षी देखील याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक-भक्त येत असतात. विशेष म्हणजे नागपंचमी व श्रावणी सोमवार एकाच दिवशी असल्याने आजच्या दिवसाला अधिक महत्व आहे.
बाबूलनाथ हे मुंबईतील सर्वात सुप्रसिद्ध शिवमंदिर आहे. हे मंदिर १२ व्या शतकात राजा भीमदेव यांनी बांधले आहे. मरिन लाईन्स जवळील लहान टेकडीवर हे मंदिर आहे. मात्र, आजूबाजूला असलेल्या उंचचउंच इमारतींमुळे हे मंदिर दुर्लक्षीत झाले आहे. हे मंदिर जमीनदोस्त झाले होते. मात्र, १७८० साली या मंदिराचे काही अवशेष सापडल्याने मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली.
श्रावण महिन्यात का करतात उपवास?
सोमवार हा शंकराचा दिवस समजला जातो. या दिवशी उपवास केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात, अशी भक्तांची भावना आहे. त्यामुळे या दिवशी अनेक महिला आणि अविवाहीत मुली उपवास करतात.
श्रावण महिन्यात प्रत्येक मंदिरात घरात 'हर हर महादेव', असे स्वर आपल्या कानावर पडतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात विशिष्ट पद्धतीने महादेवाचे पूजन एका केले जाते. श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना म्हटल्या जाते. त्यामुळे श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले जाते.
देवी सतीने तिचे पिता दक्षच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता. त्यापूर्वी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरुपात मिळवण्याचा प्रण केला होता. देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती, असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रुपात जन्म घेतला. पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला. त्यानंतर महादेवासाठी श्रावण महिना विशेष झाला, अशी भावना आहे.