मुंबई - दादर चैत्यभूमी येथे लाखोंच्या संख्येने देशभरातून भीम अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. यासाठी पालिकेकडून दरवर्षी त्यांची काळजी घेतली जाते. त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. एखाद्याला आरोग्याचा त्रास जाणवल्यास त्याच्यावर उपचार केले जातात. मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. यामुळे एक वर्ष अनुयायांना अभिवादन करता आलेले नाही. मागील वर्षी मास्क लावून अभिवादन करावे लागले. यंदा सर्वच नियम शिथिल झाल्याने लाखोंच्या संखेने भीम अनुयायी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे आले आहेत.
७२१३ जणांची आरोग्य तपासणी - दरवर्षी प्रमाणे पालिकेच्या आरोग्य विभागाने यंदाही दादर, चैत्यभूमी, शिवाजी पार्क आदी परिसरात कॅम्प लावले होते. चैत्यभूमी येथे आलेल्या अनुयायांची ३ ते ६ डिसेंबर दरम्यान ७,२१३ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. एका शिफ्टमध्ये १५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. तसेच, २४ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या अशी माहिती पालिकेच्या जी उत्तर विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विरेंद्र मोहिते यांनी दिली आहे.
मुलाला कानपूरला नेले - मुंबईत गोवर या संसर्ग जन्य आजाराचा झपाट्याने प्रसार होत आहे. या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी येथे कानपूर येथून आलेल्या एका मुलाची तपासणी केली असता त्याला गोवर झाल्याचा संशय आला आहे. त्यामुळे त्या मुलाला कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता कुटुंबियांनी मुलास दाखल करण्यास नकार दिला. त्या मुलावर ओपीडीत उपचार केल्यानंतर कुटुंबियांनी मुलाला पुन्हा कानपूरला घेऊन गेल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.