मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपांबाबत चर्चेच्या फैऱ्या सुरुयेत. सातत्याने नेत्यांच्या बैठका होत असून, कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार उभा करायचा याबाबतची चाचपणी सुरूय. मात्र, दोन्ही आघाड्यांमध्ये तीन-तीन पक्ष एकत्र आल्यामुळे विद्यमान खासदार यांच्यासोबतच अनेक इच्छुक नेत्यांनी आपला दावा सांगायला सुरूवात केलीय. या दाव्यांमुळं वरिष्ठ नेत्यांना वारंवार याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागतं. परंतु, प्रत्यक्षात मतदारसंघांवरून आत्ताच संघर्षाच्या ठिणग्या उडायला लागल्यात. या सर्व नेत्यांना एकत्र बांधून ठेवण्यात किंवा त्यांचे समाधान करण्यात दोन्ही आघाड्यांतील वरिष्ठांना किती यश येतय हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, तसं न झाल्यास लोकसभा निवडणुकीत बंडखोरांची फौज उभी राहण्याची शक्यता वर्तवली जातीय.
कोणत्या मतदारसंघांवर आहे दावा : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक हे विद्यमान खासदार आहेत. मात्र, या दोन खासदारांबाबत नाराजी असल्याने भारतीय जनता पक्ष या जागांवर दावा करतोय. तर, दुसरीकडे यवतमाळ-वाशिम मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी या विद्यमान खासदार आहेत. भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचं बँक खातं आयकर विभागाने गोठवलंय. भावना गवळी यांच्याबाबत भारतीय जनता पक्षामध्ये नाराजी आहे. त्यामुळेच त्यांच्यावर अशा पद्धतीची कारवाई सुरू असून त्यांना यावेळी उमेदवारी दिली जाणार नाही अशी चर्चा सुरू झालीय. पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनीही या चर्चेला दुजोरा दिलाय.
काय म्हणाल्या भावना गवळी : यवतमाळ वाशिम मतदार संघ हा माझा पारंपरिक लोकसभा मतदारसंघ आहे. माझ्या मतदारसंघावर अन्य कुणी दावा करू शकत नाही. काहीही झालं तरी मी माझा मतदारसंघ सोडणार नाही. मी या ठिकाणाहूनच लोकसभेची निवडणूक लढवणारं. जर महायुतीने या ठिकाणी दुसरा उमेदवार देण्याचा प्रयत्न केला, तर त्याला आपला विरोध राहील असं भावना गवळी यांनी यावेळी स्पष्ट केलंय. त्यामुळे या मतदारसंघावरून महायुतीमध्ये आत्ताच ठिणग्या पडू लागल्यात असं चित्र आहे.
अद्याप उमेदवार निश्चिती नाही : खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, महायुतीमध्ये अद्याप जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय अथवा चर्चा झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघावर दावा करू शकतात. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याची मुभा आहेच. मात्र, यासंदर्भात महायुतीचे वरिष्ठ नेते एकत्र बसून चर्चा करतील. त्यानंतरच मतदार संघाची यादी अंतिम होईल. त्यामुळे आत्ताच कोणी आपापला दावा जरी सांगितला असला, तरी ते अंतिम नाही असंही ते म्हणाले.
मुंबईतील लोकसभा मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा : दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही मतदार संघातील उमेदवारीवरून संघर्ष पाहायला मिळतोय. मुंबईतील दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघावर विद्यमान ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे उमेदवार असतील असं जाहीर केलंय. तर, दुसरीकडं महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने या मतदारसंघातील माजी खासदार मिलिंद देवरा यांनी या जागेवर दावा केलाय. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा आता शिवसेना शिंदे गटाकडे म्हणजेच राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्याकडे आहे. मात्र, असं असलं तरी ठाकरे गटाने या जागेवर दावा सांगितला आहे. तर काँग्रेसच्या वतीने वर्षा गायकवाड या सुद्धा या जागेवर दावा करत आहेत. त्यामुळे इकडेही संघर्ष पाहायला मिळतोय.
वरिष्ठांच्या मान्यतेने नावे निश्चित होणार : सोलापूर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनीही दावा केलाय. यासंदर्भात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, प्रत्येक नेत्याला आणि कार्यकर्त्याला आपल्याला संधी मिळावी असं वाटत असतं. जर नेत्यांनी दावा केला असेल तर त्यात फारसं वावग काही नाही. मात्र, उद्या नवी दिल्लीमध्ये मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भातील एक बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल. तसंच, जोपर्यंत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते एकत्र बसून निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही उमेदवाराचं नाव निश्चित झालेलं नसेल असंही लोंढे म्हणाले.
हेही वाचा :
1 १० जानेवारीच्या निर्णयाकडं सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष, तर उद्धव ठाकरे गटाला निकालाकडून अपेक्षा धूसर
2 'तुमच्याकडं 10 लाख गाड्या तर, आमच्याकडं 2 हजार गाढवं तयार', ओबीसी समाजाचाही आंदोलनाचा इशारा
3 हिना गावित यांना लोकसभेची उमेदवारी नको- सर्वपक्षीय नेत्यांच्या फोरमची मागणी