मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ही याचिका दाखल केली आहे. मराठा समाजाला इडब्ल्यूएस अंतर्गत आरक्षण देण्याची विनायक मेटे यांची मागणी आहे. आर्थिक दुर्बल घटक अंतर्गत आरक्षण द्यावे, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे. चार दिवसांपूर्वीच विनायक मेटे यांनी अशोक चव्हाण यांच्या विरोधात ही याचिका दाखल केली असल्याचे म्हटले आहे.
'..तर आक्रोश मोर्चा काढू'
मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्याने मराठा समाज खुल्या प्रवर्गात आलेला आहे. त्यामुळे ज्या समाजाला कुठेही आरक्षण नाही त्यांना इडब्ल्यूएस (आर्थिक मागास प्रवर्गाचे) आरक्षण मिळू शकते. त्यामुळे आम्ही सरकारला यासंदर्भात वारंवार विनंती केली, मात्र सरकार इडब्ल्यूएस आरक्षणाच्या एका ओळीचाही जीआर सरकार काढत नाही. म्हणून ही याचिका मी दाखल केलेली आहे, असे विनायक मेटे यांनी म्हटले आहे. लवकरात लवकर सुनावणी घेऊन मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांना नोटीस बजावण्याची खंडपीठापुढे विनंती करणार आहे, असे विनायक मेटे यांनी सांगितले आहे. शैक्षणिक क्षेत्र किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने पाच मे रोजी झालेल्या सुनावणीत रद्द केला. या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने संविधानिक ठरवलेले आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकारने गांभीर्याने घ्यावे अन्यथा येत्या पाच जून रोजी बीडमध्ये मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा आम्ही काढणार आहोत, असा इशाराही या वेळी आमदार विनायक मेटे यांनी सरकारला दिला आहे.
हेही वाचा- उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत गुप्तभेट; निलेश राणेंचा गौप्यस्फोट