मुंबई - जागतिक साहित्यात मराठी कवितेतून सामाजिक लढा दर्शवून वेगळी ओळख निर्माण केलेले कवी म्हणजे नामदेव ढसाळ. त्यांच्या स्मृती जपणारा 'सारं काही समष्टीसाठी' हा महोत्सव 14 व 15 मार्चला मुंबईत आयोजीत करण्यात आला आहे. हा महोत्सव मुंबई विद्यापीठातील विद्यानगरी, कलीना कॅम्पस येथील मराठी भाषा भवन येथे आयोजीत केला आहे.
कोणतीही कला ही जगण्याची प्रतीक असेल तर त्यात समाजातील सर्व घटकांचा समावेश हवा, असा आग्रह या सारं काही समष्टीमधून मांडला जातो. कलाक्षेत्राने आपलं अभिजनपण जपण्याच्या नावाखाली आजपर्यंत विशिष्ट कलाप्रकारांनाच अवाजवी महत्त्व प्रदान करून आपली चौकट आखूड केली आहे. या चौकटीत अभिजनेतर सौंदर्यशास्त्रांची मांडणी करणाऱ्या कोणत्याही कवी कलावंतांना स्थान नाही. ते स्थान सारं काही समष्टीच्या निमित्ताने आता निर्माण झाले आहे. हा लोकमंच सर्वांसाठी खुला आहे. अगदी या मंचाद्वारे साध्य होणाऱ्या कलेच्या राजकारणाविरोधात असणाऱ्यांचेही स्वागत येथे केले जाते.
मागील वर्षीच्या सोहळ्यात किरण नगरकर, अनुराग कश्यप, मारी सेल्वराज यांच्यासमवेत अनेक लेखक, कवी, कलावंतांनी सहभाग नोंदवला होता. यावर्षीच्या सोहळ्यातही अनेक चित्रकार, छायाचित्रकारांचे प्रदर्शन लेखक, 25 लघूपट व माहीतीपटांचे प्रदर्शन, चित्रपट दिग्दर्शक, कवी, कलावंतांसोबत चर्चासत्रे, नाटककार, नाटकांचे मंचन, कथाकारांसोबत चर्चा, कथावाचन, कवितावाचन, पुस्तक विक्री व प्रकाशन आणि समष्टी पुरस्कारांचे वितरण असे एकूण शंभरहून अधिक कलाकारांद्वारे विविध कलांचे व कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे.