नवी मुंबई - स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत 'माझं शहर - माझा सहभाग' या ( My City My Participation Campaign ) उद्दिष्ट पूर्तीच्या दृष्टीने नागरिकांच्या सहभागावर भर देत नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ( Navi Mumbai Muncipal Coporation ) विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जुन्या टाकाऊ वस्तूचा स्टॅण्ड उभारून ( Old Waste Stand ) या वस्तू गरजूंना पुनर्वापरासाठी ठेवण्यात आल्या आहेत. जुन्या वस्तूंचा पुनर्वापर व्हावा व दैनंदिन कचऱ्याचे प्रमाण कमी व्हावे, यादृष्टीने स्टॅण्ड संकल्पना राबवण्यात आली आहे.
महानगरपालिका क्षेत्रात विविध विभागांमध्ये स्टँड - नागरिकांकडून बरेचदा रोजच्या ओल्या व सुक्या कचऱ्यासोबत जुन्या वस्तूदेखील कचऱ्यामध्ये दिल्या जातात. यामधील अनेक वस्तू पुन्हा वापरात आणल्या जाऊ शकतात. अशा वस्तूंचा पुनर्वापर व्हावा व दैनंदिन कचऱ्याचे प्रमाण कमी व्हावे, यादृष्टीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रभागात 'थ्री आर' संकल्पनेअंतर्गत अर्थात कचरा निर्मितीत घट (Reduce), टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर (Reuse) व कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया (Recycle) या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात विविध विभागांमध्ये ठिकठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण स्टॅण्ड उभे करण्यात आलेले आहेत.
गरजूंना जुन्या वस्तूचा करता येणार वापर - या स्टँडमध्ये विविध प्रकारच्या वस्तू ठेवण्यासाठी विशिष्ट कप्पे तयार करण्यात आलेले असून नागरिकांनी त्यांच्या वापरात नसलेले मात्र वापर केला जाऊ शकतो, असे चांगल्या प्रकारचे दैनंदिन वापरातील कपडे, चपला व बूट, भांडी, खेळणी, चादर, ब्लॅंकेट अशा प्रकारच्या विविध वस्तू या स्टँण्डमध्ये आणून ठेवल्यास त्या तेथून गरजूंना आपल्या वापरासाठी घेऊन जाणे व वापरात आणणे शक्य होईल, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे. 'नको असेल ते द्या आणि हवे असेल ते घ्या' असा, हा अभिनव उपक्रम असून यामुळे सुक्या कचऱ्याचे प्रमाण कमी होऊन ती ती कचऱ्यात टाकली जाणारी वस्तू पुन्हा वापरात येणार असल्याने ज्यांना या वस्तूंची गरज आहे, अशा व्यक्तींना त्याची मदत होईल. शिवाय ती वस्तू बनविण्यासाठी लागणाऱ्या साधनांचीही बचत होणार आहे.
बेलापूर ते दिघा या क्षेत्रात 35 ठिकाणी स्टँड - सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बेलापूर ते दिघा या क्षेत्रात 35 ठिकाणी हे स्टँड ठेवण्यात आले असून आगामी काळात लवकरच सर्व 111 प्रभागांमध्ये हे स्टँड उभारण्याचे नियोजन आहे. संबंधित विभाग कार्यालयांकडे त्याच्या देखभालीची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
हे स्टँड ज्या भागात ठेवलेले आहेत त्या भागातील सफाई कामगारांच्या पर्यवेक्षकाकडून या स्टँडमधील साहित्याची काळजी घेतली जात असून त्यामध्ये असलेले कपडे, पुस्तके, चपला, बूट, भांडी, खेळणी व इतर वस्तूंच्या विशिष्ट कप्प्यात त्या त्या वस्तू ठेवल्या जात असल्याबाबत लक्ष दिले जात आहे. दररोज पर्यवेक्षक त्यांची पाहणी करून योग्य कप्प्यात योग्य वस्तू ठेवली जाईल याची काळजी घेत आहेत. वर्दळीच्या ठिकाणी व निवासी भागाजवळ हे स्टँड ठेवण्यात आलेले असल्याने नागरिकांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करावा व शहर स्वच्छतेमध्येही या उपक्रमाच्या माध्यमातून योगदान द्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यावतीने करण्यात येत आहे.