मुंबई - राज्यभरात कोरानाचे थैमान सुरू असताना राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात देखील कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या शंभर टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करावा, अशी मागणी अधिकारी महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे.
कोरोनाचा अटकाव करण्यासाठी सज्ज असलेल्या राज्याच्या प्रशासकीय मुख्यालयात म्हणजे मंत्रालयातच मागच्या साडे पाच महिन्यात तब्बल पंधरा मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाचे गदि कुलथे यांनी हा दावा केला असून 100 टक्के उपस्थितीबाबत फेरविचार करण्याची मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज्यात कोरोनाने 11 लाखांचा आकडा पार केला आहे. हा आकडा आटोक्यात आणण्यासाठी राज्याची प्रशासकीय यंत्रणा पूर्ण ताकदीने काम करत आहे. मंत्रालयात कर्मचार्यांसाठी पुरेशा सुविधा नाहीत. अनेक मंत्रालयीन कर्मचारी उपनगरातून कामासाठी येतात. शंभर टक्के उपस्थितीमुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून शासनाने या उपस्थितीवर पुनर्विचार करून मर्यादित कर्मचारी संख्येमध्ये पुन्हा कामकाज सुरू करावे, अशी मागणी राजपत्रित अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्य सरकारकडे केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास महासंघाच्या वतीने राज्यभरात कामबंद आंदोलन सुरू करू असा इशारा त्यांनी दिला आहे.
हेही वाचा - शिवसेनेने कृषी धोरणावर सभात्याग का केला, हे त्यांनाच विचारा- अशोक चव्हाण