मुंबई - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या आगामी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहेत. राज्यात दिवसागणिक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात आतापर्यंत ३ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकासही कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यालय सील करण्याची तयारी सुरू झाली आहे.
विधिमंडळाचे आगामी पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्टपासून प्रस्तावीत आहे. त्यामुळे अधिवेशन तोंडावर असताना ही खळबळ उडाली आहे. सध्या विधानसभा अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकांसह त्यांच्या जवळच्या दोन नातेवाईकांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. ३ ऑगस्टपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू करण्याची तयारी असताना विधानभवनातील कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा विळखा वाढता दिसत आहे. स्वीय सहाकाय्यकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यालय सील करण्याची तयारी सुरू झाली आहे. यापूर्वीही विधिमंडळात जवळपास १८ कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातील एका कर्मचार्याचा मृत्यूदेखील झाला आहे.
अधिवेशन तोंडावर आले असल्यामुळे विधानभवनाच्या कर्मचाऱ्यांनी ५० टक्के कामावर यावे, असा आदेश काढण्यात आला होता. पण विधानभवातील कर्मचाऱ्यांमध्ये वाढत असलेला कोरोनाचा विळखा लक्षात घेऊन या निर्णयावर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे.