मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तात्पुरत्या स्थगितीनंतर या समाजातील काही नेत्यांकडून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आहे. याविरोधात राज्यातील ओबीसी, बारा बलुतेदार संघटना आक्रमक झाल्या आहेत. ओबीसी आरक्षण बचावसाठी या संघटनांनी ८ ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन पुकारण्याचा इशाराही दिला आहे.
बंजारा समाजाचे व माजी मंत्री हरीभाऊ राठोड, धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती आज मुंबईत ओबीसी नेत्यांकडून देण्यात आली. राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी आधी सगळ्यांची भूमिका होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिल्यानंतर अनेकांची भूमिका बदलली असल्याने ओबीसी आरक्षण अडचणीत आणले जाणार असल्याचा दावा प्रकाश शेंडगे यांनी केला. तसेच, हे आंदोलन राज्यव्यापी असून हा आंदोलनाचा पहिला टप्पा असेल, तसेच पुढच्या टप्प्यातील आंदोलन तहसील कार्यालयाबाहेर केलं जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
हेही वाचा - राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील अशी परिस्थिती, चंद्रकांत पाटलांचा दावा
दरम्यान, ओबीसी नेत्यांनी आज खासदार संभाजीराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राजे यांनी या नेत्यांना मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होऊ नये. आपण सर्व जण एक कुटुंब आहोत. सर्वांनी मराठा आरक्षणाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. ओबीसी समाजाच्या ज्या चिंता आहेत त्या ऐकून घेण्याची विनंती हरिभाऊ राठोड यांनी केली. संपूर्ण ओबीसी समाज मराठा समाजसोबत सहकार्याची भावना घेऊन मदत करेल, असाही शब्द त्यांनी दिला. यावेळी मुस्लीम ओबीसी समाजाचे अध्यक्ष युनूस मणियार हे सुद्धा होते. तसेच, बाराबलुतेदार संघटना आणि कुंभार समाजाचे नेते उपस्थित होते.
हेही वाचा - ऊसतोड कामगारासाठी तोडगा काढावा; कारखानदारांचे शरद पवारांना साकडे