मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात (Maharashtra including Mumbai) गेल्या काही दिवसात गोवर या आजारांचा प्रसार वाढू लागला आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षापेक्षा ५ पटीने गोवरच्या रुग्णांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मृत्यूच्या संख्येत गेल्या वर्षापेक्षा ४ पटीने तर, संशयित रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ (number of measles patients has increased) झाली आहे. राज्याप्रमाणे मुंबईमध्येही गेल्या वर्षापेक्षा १८ पटीने गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातही गोवरचा उद्रेक झाल्याचे समोर आले आहे. Measles Patients
राज्यात ५.४६ पटीने रुग्णसंख्या वाढली : मुंबईमध्ये सप्टेंबर महिन्यापासून ताप आणि लाल पुरळ आलेले रुग्ण आढळून येत आहेत. गोवरचा प्रसार मुंबईपुरता मर्यादित राहिला नसून; राज्यातही पसरला आहे. २०१९ मध्ये ताप आणि लाल पुरळ असलेले १३३७ संशयित रुग्ण आढळून आले होते. १५३ रुग्णांना गोवर झाला होता. तर ३ जणांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये ताप आणि लाल पुरळ असलेले २१५० संशयित रुग्ण आढळून आले होते. १९३ रुग्णांना गोवर झाला होता तर ३ जणांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये ताप आणि लाल पुरळ असलेले ३६६८ संशयित रुग्ण आढळून आले होते. ९२ रुग्णांना गोवर झाला होता तर २ जणांचा मृत्यू झाला होता. २०२२ मध्ये त्यात वाढ होऊन ताप आणि लाल पुरळ असलेले ६४२१ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. ५०३ रुग्णांना गोवर झाला असून; आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९ च्या तुलनेत यंदा ३.३८ पटीने, २०२० मध्ये २.६० पटीने तर २०२१ च्या तुलनेत ५.४६ पटीने रुग्णसंख्या वाढली आहे.
राज्यात मृत्यूच्या संख्येत चार पटीने वाढ : महाराष्ट्रात २०१९ मध्ये गोवर या आजारामुळे ३ मृत्यू झाले होते. २०२० मध्येही गोवारमुळे ३ मृत्यू झाले. २०२१ मध्ये गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये किंचित घट होऊन २ मृत्यूंची नोंद झाली होती. २०२२ मध्ये त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ८ मृत्यूची नोंद झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मृत्यूच्या संख्येत चार पटीने तर त्याआधीच्या वर्षांच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.
मुंबईत १८ पटीने वाढ : मुंबईमध्ये २०२० मध्ये गोवरचे २५ रुग्ण आढळून आले होते. २०२१ मध्ये रुग्णसंख्येत घट होऊन ९ रुग्णांची नोंद झाली होती. २०२२ मध्ये गोवरचा उद्रेक होऊन आतापर्यंत १६९ रुग्णांची नोंद झाली आहे. २०२० च्या तुलनेत यावर्षी ६.७६ पटीने तर २०२१ च्या तुलनेत १८.७७ पटीने गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मुंबईत यावर्षी ८ मृत्यूंचीही नोंद झाली आहे. मुंबईमध्ये २६२३ संशयित रुग्ण आढळून आले आहे. तर ३८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १०५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत, आणि २ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
२० हजार मुलांच्या लसीकरणावर भर देणार : मुंबईत ० ते २ वयोगटातील पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले आहे. यात २० हजार मुलांचे लसीकरण राहिले आहे. काहींनी एकच डोस घेतला आहे. तर काहींनी लसिकरणच केलेले नाही. त्यामुळे अशा २० हजार मुलांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले जाणार असून; या सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
बेड्सची संख्या वाढवणार : मुंबईत गोवरचे सर्वाधिक रुग्ण गोवंडीत आढळले आहेत. येथील रुग्णांना कस्तुरबा रुग्णालय लांब पडत असल्याने तेथील शताब्दी रुग्णालयात १० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहेत. तसेच या परिसरातील मॅटर्निटी होममध्येही रुग्णांना दाखल केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
मुस्लिम लोकप्रतिनिधींकडून जनजागृती : मुस्लिम रहिवासी वस्त्यांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये अशिक्षित पणा तसेच अस्वच्छता यामुळे गोवरचा प्रसार वाढत आहे. लसीकरण करून न घेतल्याने प्रसार आणखी वाढत आहे. अशा विभागात लसीकरण आणि जनजागृती करण्यास गेल्यावर आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सहकार्य मिळत नाही. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या विभागात गोवरचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती आणि लसीकरण महत्वाचे आहे. त्यासाठी पालिकेने उर्दू बोलता येणारे डॉक्टर या विभागात पाठवले आहेत. उर्दूमध्ये नागरिकांशी संपर्क साधून लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले जात आहे. मुस्लिम समाजातील लोकप्रतिनिधीना लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांचे सहकार्य मिळाल्यास लसीकरण करणे सोपे होणार असल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले.
घरोघरी सर्वेक्षण व अतिरिक्त कॅम्प : मुंबईत गोवरचा वाढता धोका लक्षात घेऊन पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. विभागवार घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण केले जात असून; लक्षणे आढळणा-या मुलांना रुग्णालयात दाखल केले जाते आहे. त्यासाठी अतिरिक्त आरोग्य कॅम्प आयोजित केले जात आहेत. लसीकरणावरही भर दिला जातो आहे. गोवरचे रुग्ण झोपडपट्टीतील असल्याने या भागात जनजागृती केली जाते आहे. Measles Patients