मुंबई - नुकतीच लोकसभा निवडणुका पार पडल्या, निकाल देखील लागला. महाराष्ट्रातून 48 खासदार दिल्ली येथे जाऊन शपथही घेणार आहेत. या खासदारांना मराठी भाषा ज्ञात आहे. यामुळे निवडून आलेल्या खासदारांनी दिल्ली येथे मराठीमध्ये शपथ घ्यावी, अशी '#मराठीतचशपथ', अशी मोहीम समाज माध्यमावर उभारली आहे. प्रत्येक नेटिझन निवडून आलेल्या प्रतिनिधींना हॅश टॅग करत मराठीमध्येच शपथ घ्यावी म्हणून विनंती करत आहे.
मराठी भाषा भारतातील तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे. आपल्या मराठी भाषेचा जगभरात गौरव केला जातो, मग महाराष्ट्रातील खासदारांचे शपथविधी मराठीत का असू नयेत? मराठी भाषेबाबतच्या आणि खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी, अशा आशयाचे अनेक ट्विट ट्विटरवर अनेकांकडून केले जात आहेत. अनेकांनी तर नव्या खासदारांना टॅग करत ही मागणी केली आहे. मात्र, अद्याप एकाही खासदाराने नेटीझन्सच्या ट्विटला उत्तर दिलेले नाही. नेटकाऱ्यांची व मराठी भाषेला आग्रह करणाऱ्या लोकांची मोहीम कितपत यशस्वी ठरते हे शपथविधी कार्यक्रमात दिसून येईलच.