मुंबई - मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिका आरोग्य विभागाला यश येत आहे. त्यामुळे विभागस्तरावर, शाळा व हाॅटेल येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेले कोरोना कोविड सेंटर -१, व कोरोना कोविड सेंटर - २ हे बंद करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. यापुढे कोरोनाबाधित रुग्णांवर जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार होणार असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
मार्च महीन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि पालिकेसह राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा कामाला लागली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा, हाॅटेल व पालिकेच्या अखत्यारितील जागांवर कोरोना कोविड सेंटर १ व २ उभारण्यात आले आहे. परंतु, कोरोना आटोक्यात आणण्यात पालिकेला यश येत असून, रोज १ हजार नवीन रुग्णांची नोंद होत असली तरी प्रत्यक्षात २० ते ३० रुग्णांना खाटांची गरज भासते. त्यामुळे पालिका रुग्णालयांसह कोरोना कोविड सेंटरमधील खाटा रिक्त पडल्या आहेत. त्यामुळे विभागात शाळा, हॉल, हॉटेल या ठिकाणी कोरोना कोविड सेंटर १ व २ बंद करण्याच्या सूचना पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी संबंधित उपायुक्त व सहायक आयुक्तांना दिले आहेत. दरम्यान, यापुढे कोरोनाबाधित रुग्णांवर जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार होणार असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालिका आरोग्य विभागाने ५ जम्बो कोविड सेंटर उभारली आहेत. वांद्रे - कुर्ला संकुलात एमएमआरडीए मैदानावर दोन जम्बो कोविड सेंटर उभारले असून तेथे २ हजार खाटांची क्षमता आहे. गोरेगाव नेस्को येथे, दहिसर व मुलुंड चेक नाका येथे व महालक्ष्मी रेसकोर्सवर जम्बो कोविड सेंटर उभारले आहेत. त्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. परंतु मुंबईत आता कोरोना नियंत्रणात येत असून कोरोना कोविड सेंटर १ व २ या ठिकाणी खाटा रिक्त पडल्या आहेत. त्यामुळे विभागवार सुरू असलेले कोरोना कोविड सेंटर बंद करत यापुढे फक्त जम्बो कोविड सेंटरमध्येच उपचार केले जणार असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याने तसेच केंद्र सरकारच्या टीमने रुग्ण वाढ होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार कोरोना जम्बो केअर सेंटर उभारली आहेत. सध्या रुग्ण कमी होत असल्याने विभागवार रुग्णालये, केअर सेंटरमधील खाटा रिक्त आहेत. रुग्ण नसल्याने त्यावर होणारा खर्च कमी करण्याचीही गरज आहे. तसेच पावसाळी आजाराचे रुग्ण या कालावधीत जास्त आढळून येत असल्याने त्यांच्यासाठी रुग्णालयात खाटा रिक्त ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी विभागवार असलेले केंद्र बंद करून यापुढे जम्बो केअर सेंटरमध्येच कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईतील खाटांची क्षमता -
जास्त व गंभीर लक्षणांसाठी - १६ हजार ८८३
लक्षणे नसलेली व सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी २३ हजार ९४५
ऑक्सिजन खाटा - ११ हजार २९७
आयसीयू - १ हजार ७७६
व्हेंटिलेटर - १ हजार ८९