मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या वेळी विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्मुला तयार झाला असल्याचे वक्तव्य केले होते. दुसरीकडे मात्र, अद्याप असा कोणताही फॉर्मुला तयार झाला नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात प्रदेशकार्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पाटील यांनी हे वक्तव्य केले .
चंद्रकांत पाटील म्हणाले, "शिवसेना-भाजपचा युती करण्याचा निर्णय झाला आहे. युतीची अंतिम घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर होईल. मात्र, या युतीबाबत बाबत कोणताही फॉर्मुला अद्याप ठरला नाही" दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांची बैठक झाली असून या बैठकीत युतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटल्यात जमा असल्याचे बोलले जात होते. शिवसेनेला १२६ जागा देण्याचा प्रस्ताव असल्याचेही वृत्त आहे. मात्र, पाटील यांच्या वक्तव्याने युतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम असल्याचेच दिसून येते.
हेही वाचा - आज बाळासाहेब ठाकरे असते तर? 'अशी' असती शिवसेना!
युतीचा अंतिम फॉर्म्युला ठरल्यावर लोकसभेप्रमाणे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होईल. मात्र, त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित असतील की नाही, याबाबत आत्ताच सांगता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेचे नेते युतीच्या मुद्यावर काय बोलतात हे मी ऐकले नाही, मात्र बैठकीच्या वेळी याबाबतही चर्चा होईलच असे त्यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री 'वर्षा' निवासस्थानी भाजपच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने विचार विनिमय होणार आहे.