मुंबई - मुंबईमधील रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कोरोना विषाणूवर उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी दोन तृतीयांश रुग्णांचे लसीकरण झाले नसल्याचे समोर आले आहे. मात्र, महापालिकेच्या रुग्णालयात मुंबई बाहेरील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचार घेत आहेत. यामुळे अशी परिस्थिती निदर्शनास येत आहे. मुंबईमध्ये काही वेळा लसीचा तुटवडा जाणवत असला तरी लसीकरण वेगात सुरू असल्याचा दावा पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.
सर्वच रुग्ण मुंबईमधील नाहीत
मुंबईमध्ये गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट आली. सध्या ही लाट ओसरत असल्याने 300 ते 400 रुग्ण आढळून येत आहेत. त्यापैकी 10 टक्के रुग्णांना लक्षणे असल्याने रुग्णालयात दाखल करावे लागते. इतर रुग्ण घरी राहून बरे होतात. अशा परिस्थितीत मुंबईमधील रुग्णालयांतील बेड्स रिक्त आहेत. त्यावर मुंबईबाहेरील रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मुंबईमध्ये चांगले उपचार केले जात असल्याने राज्यातून तसेच देशभरातून रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात येतात. सर्वच रुग्ण मुंबईमधील नसल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी दोन तृतीयांश रुग्णांचे लसीकरण झाले नसल्याचे म्हणणे योग्य ठरणार नाही.
असे झाले लसीकरण
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम राबवली जात आहे. मुंबईत 18 वर्षावरील एकूण 90 लाख नागरिक आहेत. त्यांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यापैकी 71 लाख 24 हजार 820 नागरिकांना पहिला तर 28 लाख 50 हजार 558 नागरिकांना दोन्ही डोस दिले आहेत. मुंबईत लसीचा तुटवडा असला तरी दिवसाला 70 ते 80 हजार तर काही वेळा 1 ते दीड लाख लसीकरण झाले आहे, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे. मुंबईत तिसरी लाट येऊ नये यासाठी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
दुसरा डोस घेतलेल्या 26 जणांनाच कोरोना
मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यानंतर आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. रोजची रुग्णांची संख्या 11 हजारांवर पोहोचली. दुसऱ्या लाटेत 4 लाख लोक कोरोनाबाधित झाले. या दरम्यान, मुंबईत कोरोनावरील लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवण्यात आली. वाढत्या कोरोनामुळे लसीकरणाचे महत्त्वही लोकांना समजल्यानंतर लसीकरणाचे प्रमाण वाढले. कोविशिल्ड व कोवॅक्सिनची लशी दिली जात आहेत. यामध्ये पहिल्या डोस घेतल्यानंतरही 10 हजार 500 जणांना कोरोना झाला. मात्र दुसरा डोस घेतलेल्यांना अवघ्या 26 जणांनाच कोरोना झाला, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
हेही वाचा - पुण्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना संतापजनक, अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया