मुंबई- निवडणुका म्हटल्या की प्रचार रॅली आणि मोठ्यामोठ्या सभा यांचा फार मोठा गाजावाजा असतो. परंतु, या सर्वच बाबींना फाटा देत कुर्ला विधानसभा मतदार संघातील एका उमेदवाराने आतापर्यंत सात हजार घरांचे उंबरे पालथे घातले आहेत. दहा हजार घरापर्यंत जाण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा- ऑनलाईन कॅम्पेनद्वारे देणगी मिळवण्यात 'वंचित' सर्वात आघाडीवर
कुर्ला विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीचे उमेदवार नितीन भोसले हे जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले उमेदवार आहेत. तशी त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रावर नोंदणी केलेली आहे. या मतदारसंघात सर्वात कमी संपत्ती असलेले उमेदवार असून त्यांनी आपला प्रचार करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या मोठ्या सभा आणि रॅली आतापर्यंत काढली नाही. रॅली आणि प्रचार सभा काढून वेळ घालवण्यापेक्षा आपण आपल्या मतदारसंघातील दारोदार फिरत आहोत. बाजार आणि व्यापारी पेठांमध्ये दुकानांमध्ये जाऊन सुद्धा मी आपला प्रचार करत असल्याची माहिती नितीन भोसले यांनी दिली.
कुर्ला विधानसभा मतदारसंघात एकूण सहा उमेदवार आहेत. यामध्ये खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद कांबळे शिवसेनेचे मंगेश कुडाळकर आणि एमआयएमचे रत्नाकर डावरे यांच्यात आहे. त्यातही या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने एमआयएमला पाठिंबा दिला असल्याने रत्नाकर डावरे यांच्या बाजूने मुस्लिम आणि दलित मत अधिक मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे मंगेश कुडाळकर या विद्यमान शिवसेनेच्या आमदारावर मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्या नाराजीचा फायदा माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद कांबळे यांनाही मिळेल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. तर त्या तुलनेत मनसेचे उमेदवार आप्पासाहेब अवचारे यांचाही प्रचार जोमाने सुरू आहे.