मुंबई - मुंबईत वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवथाळी पार्सल देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये पार्सल देण्याचा आदेश अद्याप आलेला नाही, अशी माहिती कॅन्टीन चालवणाऱ्या शेट्टी टरिंग सर्व्हिसच्या पप्पू अस्थाना यांनी दिली.
हेही वाचा - लशीचा तुटवडा असेल तर केंद्राशी संवाद साधा; केवळ माध्यमांशी बोलून हात झटकू नका
शिवथाळी पार्सल
मुंबईसह राज्यात गेले वर्षभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असतानाच फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. हा प्रसार कमी करण्यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. सर्व उपहारगृहे, हॉटेल बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, पार्सल सेवा सुरू आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने सुरू केलेली शिवथाळी पार्सलद्वारे दिली जावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
आदेशाची अंमलबजावणी करू
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात असलेल्या कॅन्टीनमध्ये शिवथाळी दिली जाते. राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांप्रमाणे शिवथाळी पार्सल देण्यास सुरुवात केली का? अशी विचारणा केली असता या कॅन्टीनचे संचालक शेट्टी टरिंग सर्व्हिसचे पप्पू अस्थाना यांनी अद्याप असे आदेश आमच्यापर्यंत पोहचले नाहीत. तसे आदेश आल्यास त्याची अंमलबजावणी केली जाईल. आताच्या घडीला जे काही निर्णय घेतले जातील त्यासोबत आम्ही आहोत. सध्या पालिका कर्मचाऱ्यांना शिवथाळी दिली जाते. जे पार्सल मागतात त्यांना पार्सल दिले जाते, असे अस्थाना यांनी सांगितले.
हेही वाचा - कोरोनाचा वाढता संसर्ग धोकादायक असल्याने निर्बंध घातले; शासन व्यापारी-व्यावसायिकांच्या विरोधात नाही