मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी सरकारने जाहीर केलेल्या वीकेंड लॉकडाऊनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. वीकेंड लॉकडाऊनची मुंबईत कठोर अंमलबजावणी होताना दिसत आहे, त्यामुळे कालपर्यंत गर्दीतील मेट्रो स्थानके खाली असल्याचे चित्र मुंबईत दिसत आहे.
हेही वाचा - मुंबईसाठी लसीचे 99 हजार डोस प्राप्त; लसीकरणाला सुरुवात
आज आणि उद्या राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे मुंबई मेट्रो 1 वर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रोज हजारोंच्या संख्येने मुंबई मेट्रो 1 ने प्रवासी प्रवास करीत असतात. आज जरी सर्व सामान्यांना मेट्रोने प्रवास करण्याची मुभा असली, तरी मुंबईत नागरिकांनी कडक लॉकडाऊन पाळल्याचे दिसत आहे. मेट्रो स्थानकांवर अगदी तुरळक प्रवासी दिसून येत आहेत.
रेल्वे स्थानकांच्या परिसरात आज सकाळपासून शुकशुकाट
रस्ते आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरात आज सकाळपासून शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तसेच, सार्वजनिक वाहतुकीवरही निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक मंदावली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. हातावर मोजण्या इतक्या गाड्या धावत आहेत. मुंबईकर राज्य सरकारच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे.
संध्याकाळी महत्वाची बैठक
करोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांवरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दहावी आणि बारावीची परीक्षा, तसेच निर्बंध शिथिल करायचे, की अधिक कठोर करायचे, यावर विचारविनिमय केला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन आवश्यक असल्याचा पर्याय सरकारकडे आहे.
हेही वाचा - आठवड्यासाठी लागणाऱ्या लसी द्या; आरोग्य मंत्री टोपे यांची केंद्राकडे मागणी