मुंबई - माझ्यावर कार्यकर्त्यांचा दबाव आहे. त्यामुळे मी भाजपमध्ये जाण्याविषयी गांभिर्याने विचार करत आहे. माझ्यासोबत काँग्रेसचे आमदार येतील, अशा चर्चा सुरू असल्या तरी माझ्या संपर्कात सध्या कोणीही नसल्याचा खुलासा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
विखे पाटील यांनी विधानसभेत येऊन अनेक अधिकारी आणि भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्या. तसेच आपल्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला नसल्याचे सांगितले.
माझे विधानसभा क्षेत्र हे शिर्डी साईबाबा मतदारसंघात येते, त्यामुळे बाबानी दिलेला श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला मी पाळत आहे. मला माझा मुलगाही भाजपत जाण्याविषयी बोलत आहे. त्यामुळे मी त्यावर निर्णय घेणार आहे. मात्र, अजून मी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला नसल्याचे विखेंनी सांगितले.
भाजपमध्ये जाण्यासाठी काही आमदार माझ्यासोबत येत असल्याच्या चर्चा असल्या, तरी कोणताही आमदार माझ्या संपर्कात नाही. मात्र, काँग्रेसमध्ये खूप नाराजी आहे. राज्यातील नेतृत्व हे कार्यकर्त्यांना समजून घेत नाही, त्यांचा सन्मान करत नाही, परिणामी कार्यकर्ते नाराज आहेत. आता राज्यात काँग्रेसने कार्यकर्त्यांचा सन्मान केला नाही, तर येत्या काळात आणखी वाईट परिस्थिती बनेल, अशी भीतीही राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली आहे.