मुंबई- कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येला आम्ही कारणीभूत नाही, असा दावा करत एडलवाईज कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यू प्रकरणात दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, असे कंपनीने याचिकेत म्हटले आहे. राष्ट्रीय लवाद प्राधिकरणाने एनडी स्टुडिओच्या दिवाळखोरी प्रकरणाबाबत दिलेल्या आदेशानुसारच प्रक्रिया राबवली असल्याचे एडलवाईज कंपनीचे राजकुमार बन्सल आणि रिषेश शाह यांनी याचिकेत नमूद केले आहे.
एडलवाईज कंपनीच्या याचिकेत नमूद करण्यात आले की, आमच्या कंपनीने कर्ज दिले. कर्ज वसुलीसाठी कायदेशीर पद्धतीचा आम्ही अवलंब केला. त्याला आत्महत्या कशी म्हणता येईल? आम्ही आत्महत्येसाठी प्रवृत्त केले नाही. देसाई यांना कर्ज दिले होते. त्याची परतफेड करण्यासाठी उचित प्रक्रिया केल्या आहेत. मात्र रायगड खालापूर येथील पोलीस ठाणे येथील पोलिसांनी कंपनीला नोटीस बजावली. त्यात 10 साक्षीदार व्यक्तींचा जबाब घेतल्याचेदेखील नमूद आहे. कंपनी संचालक आणि अध्यक्ष यांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. यावर आज उच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता आहे.
काय म्हटले आहे एफआयआरमध्ये? नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांच्या तक्रारीनंतर कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनडी स्टुडिओवर 252 कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी एडलवाईज कंपनीचे संचालक राजकुमार बन्सल व अध्यक्ष रशेष शाह यांनी दबाव टाकल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. त्यांच्यामुळे नितीन देसाई यांनी आत्महत्या केली, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. नितीन देसाई दिल्लीवरून परतल्यावर त्यांनी 2 ऑगस्ट रोजी रात्री आपले जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या कामगाराकडे एक व्हिडिओ पाठवला होता. त्यात त्यांनी एका कंपनीचा दबाव असल्याचे म्हटले होते. त्यानंतर काही व्यक्तींनी आरोप केला की, कर्ज देणारी एडलवाईस कंपनी या पाठीमागे आहे.
एनडी स्टुडिओवर दिवाळखोरीची कारवाई- 25 जुलै 2023 रोजी, एनसीएलटीने नितीन देसाई आणि त्यांची एनडी स्टुडिओ कंपनीवर दिवाळखोरीची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. एनसीएलटीचे कोठारी मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी 29 जुलै रोजी बाऊन्सरसह स्टुडिओत येणार होते. मृत्यूपूर्वीच्या रेकॉर्डिंगमध्ये नितीन देसाई म्हणाले की, या प्रकरणात एनसीएलटी प्रशासक म्हणून काम करण्याऐवजी कोठारी हे एडलवाईसच्या दबावाखाली काम करत होते. त्यांना स्टुडिओचा ताबा घ्यायचा होता. त्यांना स्टुडिओ हा व्यावसायिक कारणांसाठी वापरण्याची इच्छा होती.
हेही वाचा-