मुंबई : Nitesh Rane on Sanjay Raut Ambadas Danve : भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या सचिवांना पत्र पाठवलंय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याविरुद्ध विशेषाधिकार भंगाची सूचना केली आहे.
ठाकरे गटाची राहुल नार्वेकर यांच्यावर टीका : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे दोघेही सातत्याने याविरोधात बोलत असतात. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सातत्यानं होणाऱ्या वक्तव्यावरच नितेश राणे यांनी आक्षेप घेतलाय. असे वक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊत व अंबादास दानवेंवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी विधिमंडळाच्या सचिवांना पत्र पाठवून केली आहे.
काय आहे पत्रात? : ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात विविध वक्तव्य केली आहेत. ती सविस्तर वक्तव्य नितेश राणे यांनी विधानमंडळ सचिवालयाला पाठवलेल्या पत्रात नमूद केली आहेत. संजय राऊत म्हणाले होते की, विधानसभा अध्यक्षांचा संविधान, कायदा व विधिमंडळाशी बेईमानी करुन आपला वेळकाढूपणा चाललाय. घटनात्मक पदावर बसलेले विधानसभा अध्यक्ष घटनाबाह्य सरकारला चालवत आहेत काय?. आम्ही करू ते खरं अशी बादशाही विधानसभा अध्यक्ष करीत असतील तर ती बादशाही बुडाल्याशिवाय राहणार नाही. इतकेच नाही तर, विधानसभा अध्यक्ष फुटले आहेत. असा थेट आरोपही संजय राऊत यांनी केला होता.
विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न : त्याचप्रमाणे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीसुद्धा विधानसभा अध्यक्षांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. ते म्हणाले होते की, उशीरा न्याय देणं हा सुद्धा अन्याय असतो आणि तो अन्याय विधानसभा अध्यक्ष करत आहेत. तसेच नितेश राणे यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सध्या पक्षांतरबंदीविषयी एका प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणामध्ये संजय राऊत व अंबादास दानवे या दोघांचेही राजकीय हितसंबंध जपले गेले आहेत. या पार्श्वभुमीवर अशी वक्तव्य करून ते विधानसभा अध्यक्षांवर अनुचित दबाव व प्रभाव टाकण्याची कृती करत असून, त्याद्वारे विधानसभा अध्यक्षांच्या तसेच पर्यायानं विधानसभेचा अधिक्षेप केला आहे.
राऊत, दानवे यांच्या बोलण्यावर तत्काळ बंदी घाला : अंबादास दानवे व संजय राऊतांच्या अशा स्फोटक भाष्यामुळं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर एकप्रकारे दबाव टाकण्याचं जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. यामुळं लोकशाहीच्या हितासाठी या प्रवृत्तीला मुळासकट आळा घालण्यासाठी त्यांच्या बोलण्यावर तत्काळ बंदी आणणं अत्यंत गरजेचं आहे व त्या अनुसार कारवाई करावी. तसेच संजय राऊत व अंबादास दानवे यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यासाठी हे प्रकरण तत्काळ विशेषाधिकार समितीकडं सुपूर्द करावं व विनाविलंब निर्णय घ्यावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
हेही वाचा -