मुंबई - नाताळ आणि नवीन वर्षात कोरोना संसर्ग वाढण्याची भीती लक्षात घेता राज्य सरकारने महारष्ट्रात नाईट कर्फ्यू (रात्रीची संचारबंदी) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान सकाळी 11 ते सकाळी 6 या वेळेत राज्यातील महानगरपालिकांक्षेत्रांमध्ये संचारबंदीची घोषणा केली आहे. मात्र, याचा फटका व्यापारी वर्गाला अधिक बसणार आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळला-
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. त्यानंतर खबरदारी म्हणून राज्यात रात्रीच्या संचारबंदीची घोषणा करण्यात आली.
व्यापारी वर्गाला फटका-
राज्यात लागू करण्यात आलेल्या या रात्र संचारबंदीचा सर्वाधिक फटका व्यापारी वर्गाला बसणार आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडते. तसेच रात्री उशिरापर्यंत हॉटेल, दुकाने, मॉल्स उघडी ठेवण्यात येतात. मात्र, आता संचारबंदीमुळे रात्री उशिरापर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. परिणामी व्यापाऱ्यांच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग चिंतेत आहे.
युरोप देशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वरंटाईन
युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तसंच, अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आल्याने राज्यात खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.