मुंबई - दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा प्रत्यक्षात सुरू करण्याचा हट्ट सोडून शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. याबाबत पुन्हा एकदा ऑनलाईन शिक्षणासाठी नवीन सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामुळे पूर्व प्राथमिक आणि पहिलीच्या वर्गातील मुलांना अर्धा तास ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवावे लागणार आहे. तर दुसरीकडे या महिन्यात नववी, दहावी आणि बारावीचे प्रत्यक्षात वर्ग सुरू करण्याची घोषणा करणाऱ्या शालेय शिक्षण विभागाने आपली भूमिका बदलत हे वर्गही तूर्तास ऑनलाईन सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात १५ जूनपासून शैक्षणिक वर्षाची सुरूवात झाली असून, त्याच दिवशी शालेय शिक्षण विभागाने पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा या सुरू करण्यासंदर्भात परिपत्रक जारी केले होते. तोपर्यंत ऑनलाईन शिक्षण आणि त्याचा कार्यक्रमही दिला होता. त्यानुसार जुलै महिन्यात नववी, दहावी आणि बारावी तर पुढील सहावी, सातवी आणि आठवीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू केले जाणार होते. मात्र, कारोनाचा प्रादुर्भाव राज्यात वेगाने वाढल्याने राज्यातील शाळा प्रत्यक्षात सुरू करता आल्या नसल्याने शाळा आणि शिक्षकही संभ्रमात सापडले होते.
नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्व प्राथमिकचे ऑलनाईन शिक्षण हे केवळ ३० मिनिटे असून त्यात पालकांशी संवाद आणि त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तर पहिलीसाठी अर्धा तासाची दोन सत्र ऑनलाईन घेतली जाणार असून, यात पहिले १५ मिनिटे पालकांशी संवाद, मार्गदर्शन आणि त्यानंतर १५ मिनिटे विद्यार्थ्यांना उपक्रम आधारीत शिक्षण दिले जाणार आहे. तिसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांना दीड तासांचे ऑनलाईन शिक्षण हे दोन सत्रांमध्ये तर नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीन तासांचे शिक्षण हे चार सत्रांमध्ये सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दिले जाणार आहे.
महिन्याभरापूर्वी केला होता शाळा सुरू करण्याचा दावा..
शिक्षण विभागाकडून राज्यातील ग्रामीण भागात नववी, दहावी आणि बारावीचे शिक्षण हे जुलै महिन्यात प्रत्यक्षात सुरू केले जाईल असा दावा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केला होता. मात्र, त्यानंतर त्यांना याचा विसर पडल्याने शिक्षण विभागाकडून २२ दिवसानंतर नवीन सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यातही आता शाळा प्रत्यक्षात कधी सुरू केल्या जातील यात कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही. यामुळे राज्यात तुर्तास ऑनलाईन शिक्षणावरच भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.