मुंबई - अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या कोरोना लढाईतील एसटी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा होत आहे. एसटीमधील कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून राज्यात एकूण 206 कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत.
लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटीच्या विशेष फेऱ्या चालविण्यात येत आहेत. त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर विभागातील कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी मुंबईत कामावर येणाऱ्या सूचना महामंडळाने दिल्या होत्या. मात्र, प्रवासी सेवा देतांना महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. यात ठाणे विभागात 86 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून मुंबई विभागात 64 कर्मचारी बाधित झाले आहेत. तसेच एसटी मुख्यालयात 10 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
या 206 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. कुर्ला नेहरूनगर आगारातील प्रथम अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहतूक नियंत्रकाचे आज(मंगळवार) निधन झाले. तर आज मुंबई मुख्यालयातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.