मुंबई - मुंबईत आता हळूहळू मालमत्ता बाजारपेठेतील व्यवहारांनाही सुरुवात होऊ लागली आहे. घर खरेदीसाठी चौकशी वाढू लागली आहे. पण त्याचवेळी इच्छुक ग्राहकांनी आता 'कोविड डिस्काऊंट' मागायला सुरुवात केली आहे. कोविड डिस्काऊंटच्या नावाखाली घरांच्या किमती कमी करा अशी मागणीच आता रिअल इस्टेट एजंटकडे होऊ लागली आहे. त्यामुळे यापुढे कोविड डिस्काऊंट हा ट्रेंड काही काळ मालमत्ता बाजारपेठेत सुरू राहण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनमुळे तीन महिने घर खरेदी-विक्री बंद आहे. त्यामुळे हजारो घरे विक्रीविना पडून आहेत. तर बिल्डरांचे मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे. विक्रीतील घट दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मात्र, आता हळूहळू घर खरेदी-विक्री व्यवहार सुरू होत आहेत. कोरोनाच्या काळात अनेकांना स्वतःचे हक्काचे घर असावे असे वाटू लागले आहे. त्यामुळे येत्या काळात विक्री वाढेल असा विश्वास रिअल इस्टेट एजंट व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे घरांच्या किमती कमी करण्याची मागणी होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून घरासाठी चौकशी वाढली आहे. त्याचवेळी डिस्काऊंट देण्याची ही मागणी होत आहे. डिस्काऊंटसाठी ग्राहकांनी कोविड डिस्काऊंट असा नवा शब्दही शोधून काढल्याची माहिती कर्मा रियल्टीच्या यशिका रोहिरा यांनी दिली आहे. काही ग्राहक असा डिसकाऊंट असलेले प्रकल्पातीलच घरे दाखवा, अशी मागणी करत आहेत. तर आता काही बिल्डरांकडून डिस्काऊंट देण्यास सुरुवात करणार असल्याचे समजते आहे, असेही यशिका म्हणाल्या.