मुंबई - कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येत्या थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागत सोहळ्यांसाठी राज्य शासनानं नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये खबरदारी म्हणून लोकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र न येता यंदा हे सोहळे अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे, असं या नियमावलीत म्हटलं आहे. राज्य सरकारने खबरदारी म्हणून नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्यात ओमायक्रॉनप्रमाणे कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहेत. आतापर्यंत राज्यात 167ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. येत्या काळात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वेगाने पसरण्याची दाट शक्यता आहे.
खबरदारीच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने नववर्षाच्या सेलिब्रेशनचा पार्श्वभूमीवर मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. 31 डिसेंबर 2021 रोजी अत्यंत साधेपणाने नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये असे सांगितले आहे.
हेही वाचा - Corona Update - राज्यात आज 3 हजार 900 तर, मुंबईत 2 हजार 510 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
अशी आहे नवीन नियमावली -
- ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी दरम्यान नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच साधेपणाने नववर्षाचे स्वागत करावे.
- २५ डिसेंबरपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यात बंदी घालण्यात आली आहे, या आदेशाचे पालन करावे.
- ३१ डिसेंबरला नववर्षाच्या स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृह उपलब्ध आसनक्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत, तर खुल्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्क्यांच्या मर्यादेत उपस्थित राहण्याची परवानगी असेल.
- तसेच ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तेथे कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षांवरील नागरिकांनी आणि दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या, आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे.
- ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करताना सोशल डिस्टन्सिंग राहिले, तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
- मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी इत्यादी ठिकाणी देखील नागरिकांनी गर्दी करू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.
- नववर्षाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये. तसेच मिरवुणका काढू नये.
- अनेक जण नववर्षाच्या सुरुवातीला धार्मिक स्थळी जातात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि आरोग्य, स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून खबरदारी घ्यावी.
- फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.
- कोरोना आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगर पालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील.