मुंबई - चेंबूर परिसरातील टिळकनगरमध्ये काही दिवसांपूर्वी एका इमारतीत कोरोनाचा एक संशयित रुग्ण आढळून आला होता. या रुग्णावर आणि त्याच्या संपर्कातील नातेवाईकांवर सध्या मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेमुळे शेजारच्या इमारतील लोकांनी आणि इमारतीत काम करणाऱ्या लोकांनी रुग्णाच्या इमारतीवर सामाजिक बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे या इमारतीतील लोक भयभीत झाले आहेत.
देशभरामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. मुंबईमध्ये 6 रुग्ण उपचार घेत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि बचावासाठी राज्य सरकार तसेच मुंबई महानगर पालिका उपाय योजना करत आहेत. या विषाणू बाबत अफवा अथवा गैरसमज पसरविला तर कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे, असे असतानाही सर्वसामान्य नागरिक कोरोना बाधित रुग्ण आणि त्यांच्या इमारतीला कोणत्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता त्यांच्या संपर्कात आल्याने हा संसर्ग होतो, असा गैरसमज पसरवित आहेत.
हेही वाचा - कोणत्याही शहराला लॉकडाऊन करणार नाही, पुढील १५ दिवस महत्त्वाचे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई उपनगरातील टिळक नगर येथील एका इमारतीतील एक 64 वर्षीय व्यक्ती दुबईवरून 6 मार्चला परतला आहे. त्या व्यक्तीला दुसऱ्या दिवशी अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्या पत्नीने आणि मुलाने फॅमिली डॉक्टरांना घरी बोलाविले. डॉक्टरांनी या संशयित रुग्णाला तपासून उपचाराकरिता रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. कुटुंबांनी रुग्णाला स्थानिक दवाखान्यात घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात घेऊ जाण्यास सांगितले. परंतू कुटुंबियांनी त्या व्यक्तीला इतर खासगी रुग्णालयात घेऊन गेले. तेथे कोरोना विषाणू सारखी लक्षणे पाहता त्याला पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले. इमारतीतील रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झालाची माहिती समाजमाध्यमावर वाऱ्यासारखी पसरली.
हेही वाचा - CORONA : विघ्नहर्त्यावर कोरोनाचे सावट; सिद्धीविनायक मंदिर दर्शनासाठी बंद
यानंतर संशयित रुग्णावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याच्या संपर्कातील कुटुंब आणि कामगारांनाही कोरोना विष्णुने बाधित झाल्याची बातमी शेजारील इमारतीमधील रहिवाशांना कळताच त्यांनी त्यांना सहानुभूती आणि मदत न करता 10 मार्चपासून आपल्याकडे येणारे दूध विक्रेते, वृत्तपत्र घरी टाकणारा मुलगा, झोमॅटो, भाजी विक्रेता, घरकाम करणारी महिला यांना रुग्ण बाधित इमारतीत जात असाल तर आमच्या इमारतीत येऊ नका. अन्यथा आम्हाला ही कोरोनाची लागण होईल, असे सांगितले. त्यानंतर त्यांना या इमारतीत जाण्यास मज्जाव केला.
हेही वाचा - 'चायनामेड' विषाणूला दूर पळवण्यासाठी सहकार्य करा'
पालिकेने त्या इमारतीची खोली आणि परिसराचे निर्जंतुकीकरण केले. तसेच विभागात एक सर्व्हेही केला. यात कोणत्याही प्रकारचा रुग्ण आढळून आला नाही. या विषाणूला संपवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन जन जागृती करणे महत्वाचे असताना, असे कृत्य केल्याने इमारतीतील रहिवाशी कोरोनासोबत सामाजिक बहिष्काराचा सामना करीत आहेत. या इमारतीचे सदस्य दिवरात्र इमारती बाहेर बसून इमारतीतील इतर राहिवाशांना धीर देत आहेत.