मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने गेल्या दोन दिवसंपासून बोलत आहेत, ते अत्यंत चुकीचे आणि असमर्थनीय आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन हिन दर्जाचे राजकारण करू नये. पंतप्रधानपदाची गरिमा राखावी अशोभनीय वर्तन करू नये अशी प्रतिक्रिया ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
गोवा मुक्तिसंग्रामा मध्ये कोण लढले आणि नेमके काय झाले याचा सर्व इतिहास उपलब्ध आहे. मोदींनी एकदा इतिहास तपासून पाहावा आणि मगच बोलावे. काँग्रेसने केलेल्या विकासाचे श्रेय काँग्रेसला न देता केवळ दूषणे देणे मोदीचे लक्षण झाले आहे. देशाचा जो काही विकास झाला तो गेल्या सात वर्षात आणि त्यापूर्वी 70 वर्षात काही झाले नाही असे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न मोदी करत आहेत. कारण त्यांना आता जनतेसमोर जायला कोणतेही मुद्दे उरलेले नाहीत. सत्ता हातातून जाईल, या भीतीने ते काहीही बरळत आहेत, अशी परखड प्रतिक्रिया ॲड. ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. देशावर आलेल्या कोरोनाचे संकट काँग्रेसमुळे आले आणि भाजपमुळे ते गेले, असे हास्यास्पद विधान पंतप्रधानांसारख्या व्यक्तीने करू नयेत, हे त्यांच्या पदाला शोभणारे नाही. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना कधीही स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी असलेले नौटंकी चाळे करावे लागले नाहीत, असा टोलाही ठाकूर यांनी लगावला.