मुंबई - महिला संरक्षणासाठी केलेल्या कायद्यांचा गैरवापर होत असल्याचा अनुभव मला आला आहे, म्हणून महिला संरक्षण कायद्याबद्दल पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर 4 जणांवर सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनेने कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी विद्या चव्हाण यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे. दरम्यान, सुनेचे चार जणांशी विवाहबाह्य संबंध होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
आमदार चव्हाण म्हणाल्या, 'माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गेली 30 वर्षे मी गोरगरीबांसाठी, महिलांसाठी लढत आहे. माझी सून माझ्या विरोधात तक्रार का करते हा माझ्यासमोर प्रश्न आहे. माझा मुलगा अभियंता आहे. तो, त्याची पत्नी, त्यांच्या 5 वर्षाच्या मुलीबरोबर कंपनी त्याला डेन्मार्कला पाठवत होती. त्या दरम्यान त्याची पत्नी, माझी सून गौरी हिच्या मोबाईलमधून काही धक्कादायक माहिती पुढे आली. माझ्या सुनेचा मोबाईल बिघडला होता तेव्हा तिने माझ्या मुलाला मोबाईल का बिघडला आहे? जरा बघ म्हणून सांगितले. त्यावेळी त्याच्यावरील व्हॉट्सअप चॅटिंग माझ्या मुलाने चेक केले. तेव्हा त्याला शॉकिंग चॅटिंग दिसली. चार जणांसोबत तिचे विवाहबाह्य संबंध आल्याचे समजले. तेव्हा त्याने घटस्फोट देण्याचे ठरवले. आता हे प्रकरण कौटुंबिक नायालयात आहे. सुनेकडून कायद्याचा गैरवापर करण्यात येत असल्याचे पाहून मला धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. म्हणून महिला संरक्षण कायद्याबद्दल पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा - समाजाची मानसिकता का बदलतेय ? अहमदनगरच्या 'त्या' घटनेचा आमदार भारती लव्हेकरांकडून निषेध
दरम्यान, विद्या चव्हाणांनी सुनेला मुलगा हवा म्हणून छळले असेही बोलले जात होते. यावर बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या की, 'नवरा बायकोच्या वादात मला अडकवण्यात आले आहे. दुसरी मुलगी झाली म्हणून करण्यात आलेले आरोप हे चुकीचे आहेत. आम्ही दुसऱ्या मुलीलाही तळाहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे, असेही त्या म्हणाल्या.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनेने 16 जानेवारीला तक्रार दिली होती. यानंतर विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल यांच्याविरोधात विलेपार्ले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तर सुनेने केलेले सर्व आरोप विद्या चव्हाण यांनी फेटाळून लावले आहेत.