मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेऊन राज्यातील निवडणुका संदर्भात काही मुद्द्यांकडे लक्ष वेधले. मांडलेल्या मुद्यावर निवडणूक आयोग सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. यावेळी पक्षाच्यावतीने निवडणूक आयोगाला निवेदन सादर करण्यात आले. निवडणुकांच्या तारखा निश्चित करताना दिवाळीच्या सुट्टीत लोक गावी जातील याचा परिणाम मतदानावर होवू शकतो, त्यामुळे याचा विचार करण्यात यावा, असे नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा - ..तर लोक आम्हाला वेडे समजतील - आदित्य ठाकरे
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवली पाहिजे. काही ठिकाणी पोलिंग बुथ हे वरच्या मजल्यावर असतात. यामुळे वयस्कर व अपंग लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. ज्या मतदारांचे मतदार यादीमध्ये फोटो नाहीत, मतदान करत असताना त्यांची काटेकोरपणे खात्री करून घेतली पाहिजे. याशिवाय बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे. या विविध मुद्द्यांवर निवडणूक आयोगाने विचार करावा, असे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी सांगितले.