मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईतील मुख्य कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आता मुंबईत आपल्याला अर्ध्या जागा हव्या असल्याची भूमिका घेतली आहे. या मागणीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत मुंबईतील जागा वाटपावरून पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी 1999 पासून आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला अत्यंत कमी जागा दिल्या जातात. मात्र यावेळी आपल्याला बरोबरच्या जागा हव्या असल्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन आहेर यांनी केली आहे. तसेच मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही आपल्याला अर्ध्या जागा हव्या आहेत, अशी मागणी लावून धरली असल्याचे अहिर यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीकडून शहराकडे चला या कार्यक्रमावर जोर देण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई राष्ट्रवादीला आपले पाळेमुळे मजबूत करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत अर्ध्या जागांवर निवडणूक लढवायची असल्याचे बोलेले जाते. यापूर्वी आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसची केवळ सात ते आठ जागांवर बोळवण केली जायची. राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान दोन जागा याप्रमाणे म्हणजेच एकूण 18 जागा हव्या आहेत.
1999 सालापासून काँग्रेसबरोबर आघाडी केल्याने राष्ट्रवादीच्या वाट्याला कमी जागा येत होत्या. आता विधानसभेत राज्यात 50 - 50 टक्याचा फॅार्म्यूला अवलंबला जात असेल तर मुंबईतही पन्नास टक्के जागा मिळाल्या पाहिजे. आणि तेवढ्या शक्य नसेल तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दोन जागा मिळायला हव्या. याबाबत काँग्रेसशी चर्चा करून आम्ही निर्णय घेणार असल्याचे अहिर यांनी सांगितले.