मुंबई - नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला आलेल्या यशानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात येऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीकडून कोणत्या प्रकारची तयारी केली जावी, यासाठीचा एका आढावा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे मंत्री खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेतला.
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरू असून यासंदर्भात राष्ट्रवादीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यापार्श्वभूमीवर आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या आढावा बैठकीत शरद पवारांनी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भरगोस यश मिळाले पाहिजे, यासाठी सर्वच पालकमंत्री, आमदार, मंत्री आणि खासदारांनी स्वतः लक्ष घालावे अशा सूचनाही आज या आढावा बैठकीत दिल्या असल्याचे सांगण्यात आले.
शरद पवार यांनी दिल्या सूचना
राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्थानिक स्तरावर कशाप्रकारे मजबूत करता येईल, याबाबतची चर्चा प्रामुख्याने या आढावा बैठकीत झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच राज्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीसंदर्भात मलिक यांना विचारले असता ते म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या निवडणुका या कुठल्याही राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लढवल्या जात नाहीत, मात्र या निवडणुकीत जे काही चित्र समोर येईल असेही मलिक म्हणाले. तसेच आज या झालेल्या आढावा बैठकीत दरम्यान, शरद पवार यांनी राज्यातील आगामी महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत संदर्भात विविध प्रकारच्या सूचना आणि त्यासाठीची चर्चा केली, अशी माहितीही मलिक यांनी यावेळी दिली. तर मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांनी नुकतेच मुंबईत काँग्रेस स्वबळावर सर्व जागा लढवणार असल्याचे सुतोवाच केले होते, त्या संदर्भात विचारले असता मलिक म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे तिन्ही पक्षांनी मिळून बनलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका ही तिन्ही पक्षांची मिळून असणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात आम्ही एकत्र मिळून निवडणुका लढवाव्यात असे आमचे ठरलेले आहे. त्यामुळे या संदर्भात जो निर्णय होईल तो पक्षश्रेष्ठी घेतील असे मलिक यांनी यावेळी सांगितले.
औरंगाबादच्या नामांतराच्या संदर्भात विचारले असता मलिक म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील कोणत्याही शहराच्या नामांतरास संदर्भात कोणतीही भूमिका नाही आणि हा विषय महाविकास आघाडीच्या कुठल्याही अजेंड्यावर नाही मात्र जे कोणी नामांतराच्या विषयावर चर्चा करतात तो त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा विषय आहे, असेही ते म्हणाले.
जनता दरबार कसा चालतोय याची माहिती घेतली
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, आज झालेल्या आढावा बैठकीत शरद पवार साहेबांनी मंत्री काय काय करत आहेत आणि जनता दरबार कसा चालतोय याची माहिती त्यांनी घेतली. काल आपल्या विभागाच्या बाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयामुळे राज्यातील बांधकाम व्यवसायिक आणि ग्राहकांनाही मोठा फायदा होईल आणि चलनातील पैसा हा अधिक मोठ्या प्रमाणात उपयोगात येईल असेही मत आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केले.
कालच्या या निर्णयावर विरोधकांना जी काही टीका करायची त्यांनी करावी आणि टीका करण्यासाठीचा त्यांना आम्ही विरोधात बसवले आहे असा टोलाही आव्हाड यांनी विरोधकाना लगावला तर भाजपाचे नेते प्रसाद लाड यांना आलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या नोटीस संदर्भात विचारले असता पवार म्हणाले की लाड यांना नोटीस आली हे मला तुमच्याकडून कळत आहे त्याबद्दल मला माहिती नाही असे सांगत यावर त्यांनी बोलण्याचे टाळले.