मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ४ व ५ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे 'राष्ट्रवादी मंथन:वेध भविष्याचा' या अभ्यास शिबिराचे (NCP Study Camp) आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी दिली आहे. पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वर्तमानस्थितीबाबत आकलन वाढवणे व भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासंदर्भात या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्षाची माहिती देणारे अॅप: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गेल्या २३ वर्षांची वाटचाल व योगदान, पक्षाने राज्यात केलेले काम, देशाची व जगाची परिस्थिती यावर दोन दिवस चर्चा होणार आहे. पक्षाने एक अॅप काढले असून या अॅपद्वारे पक्षाची सर्व माहिती, निर्णय पुढच्या पिढीला अवगत होणार आहे.
या अभ्यास शिबिराला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थित राहणार असून शिबिरात मोकळी चर्चा केली जाणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. हे शिबीर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून होत आहे.