मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या आयोगाकडे परमबीर सिंह यांनी पतिज्ञापत्र सादर केले आहे. त्याची पुष्टी सिंह यांच्या वकिलांनी केली आहे. मागील सुनावणीवेळी सिंह यांच्याकडून हे प्रतिज्ञापत्र चौकशी आयोगाकडे सादर केल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून माजी न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी आयोगाचे गठन करण्यात आले आहे. आरोगाकडून सिंह यांच्याविरोधात अनेक समन्स आणि जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र, सिंह अद्याप एकाही सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत. चौकशी आयोगाने सिंह यांच्यावर जूनमध्ये 5 हजार रुपये आणि दोन वेळा 25 हजार रुपये दंडही ठोठावला होता. प्रतिज्ञापत्र देणारे परमबीर सिंह आयोगासमोर का येत नाहीत, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे.
नेमका प्रकरण काय..?
100 कोटींच्या वसुलीचे जे आरोप अनिल देशमुख यांच्यावर झाले आहेत, त्या प्रकरणी त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय यांच्याकडून चौकशी सुरू आहे. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ईडीने विविध ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांनाही अटक केली. तसेच कुंदन शिंदे यांनाही अटक केली.
मार्च महिन्यात जेव्हा परमबीर सिंह यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आले त्यानंतर तीन दिवसात परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते आणि त्यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला 100 कोटी रूपये दर महिन्याला बार आणि रेस्तराँमधून वसूल करण्याचे टार्गेट दिल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
ठाणे आणि मुंबईतील न्यायालयाकडून अटक वॉरंट
परमबीर सिंह यांच्या विरोधात मुंबईसह ठाण्यात वसुलीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आलेली आहे. मात्र, अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे ठाण्यानंतर आता मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
परमबीर सिंह बेल्जियममध्ये..?
परमबीर सिंह हे बेल्जियममध्ये असल्याचे ट्विट काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केले होते. निरुपम यांच्या या ट्विटने आता मोठी खळबळ उडवून दिली आहे. स्वत: पाच प्रकरणात वॉन्टेड असून सिंह फरार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अशी माहिती मिळते की सिंह बेल्जियमला आहे, ते गेले कसे, तेथे जाण्यास कोणी मदत केली, आपण अंडकव्हर अधिकारी पाठवून त्यांना परत आणू शकत नाही का, असे ट्विट संजय निरुपम यांनी केले होते.
परमबीर सिंहच्या पगारला गृह विभागाचा ब्रेक
परमबीर सिंह हे गृहरक्षक दलाचे महासंचालक आहेत. मात्र, अनेक महिने गैरहजर राहिल्याने कोषागार कार्यालयाने विचारणा केली होती. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात परमबीर सिंह आठ दिवसांची रजा घेऊन चंदीगडला त्यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर तिथूनच ते सिक लिव्ह (आजारपणाची सुटी) दर 15 दिवसांनी वाढवत राहिले. त्याचे वेतन रोखण्यात आले आहे. गृहविभागाने परमबीर सिंह यांच्याविरोधात राज्य सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली असून त्याचा पहिला भाग म्हणून परमबीर सिंह यांचे वेतन रोखण्यात आले आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याची तयारी राज्य सरकारने केली असल्याचे समजते. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गृहविभाग आता या सर्व प्रकाराचा तपास करत आहे. परमबीर सिंह यांची विभागीय चौकशी सुरू आहे.
महासंचालकांच्या अहवालात काय..?
राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी 25 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा निलंबनाचा प्रस्ताव गृहविभागाला पाठविल्यानंतर चैाकशी सुरू झाली आहे. या चैाकशीत परमबीर सिंह हे गेल्या पाच महिन्यांपासून गायब असल्याची माहिती गृहविभागाला मिळाली आहे. यानंतर गृहविभागाने होमगार्ड विभागाला परमबीर सिंह यांचे वेतन रोखण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हे ही वाचा - औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी साधला संवाद.. लसीकरणाबाबतची दिली माहिती