मुंबई - विधानसभेच्या निवडणुकीत सर्वात जास्त जागा मिळवणाऱ्या भाजपला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले आहे. मात्र, 'राज्यपालांनी भाजपकडे बहुमताची खात्री करायला हवी' असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले. तसेच जी प्रक्रिया आता सुरु झाली आहे ती अगोदरच होऊ शकत होती, असेही मलिक म्हणाले.
काही केल्या राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नाही. भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या तणाव असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठीकीत आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत आपण पालखीचे भोई होतो. आता यापुढे आपण पालखीचे भोई होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. तसेच आता त्याच पालखीत शिवसैनिकाला बसवल्याशिवाय मी राहणार नाही, असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. तर अडीच वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेला देण्याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता, असे मत काळजीवाहू मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे भाजप शिवसेना यांच्यातील संबध ताणल्याचे पाहायला मिळत आहे.