मुंबई - शेतकरी आंदोलनाच्या विषयावर राज्यसभेत भाषण करत असताना देशभरात होणाऱ्या आंदोलनाची खिल्ली उडवत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सध्या सगळीकडे एक नवीन जमात पहायला मिळत असून ती जमात म्हणजे "आंदोलनजीवी" असे म्हटले होते. म्हणजे व्यावसायिक आंदोलक निर्माण झाल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भाषणाला उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून याची खिल्ली उडवण्यात आली आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राष्ट्रवादी काँग्रेसने एक व्हिडिओ पोस्ट केला असून, या पोस्टमध्ये भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांसह देशभरातील नेत्यांनी कशी आंदोलने केली हाती, याचा मिश्किल व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, किरीट सोमैय्या आणि स्मृती इराणी दिसत असून वेगवेगळ्या मुद्यांवर त्यांनी कशी आंदोलने केली किंवा आंदोलन करण्याचा इशारा दिला, याचा मिश्किलपणे उल्लेख केलेला दिसत आहे.