मुंबई - शहरात वारंवार होणारे रेल्वेचे अपघात, पूल कोसळण्याच्या दुर्घटना अतिशय चिंताजनक आहेत. मुंबई परिसरातल्या सर्व पुलांचे ऑडिट करून त्याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे . छत्रपती शिवाजी टर्मिनसला जोडणाऱ्या पादचारी पूल कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
अपघातग्रस्त पुलाचे ऑडिट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मग अपघात कसा झाला? खरंच या पुलाचे ऑडिट झाले आहे का? असे प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केले. मध्य रेल्वेने २०१५ साली राज्य सरकारला पत्र लिहले होते. यामध्ये मुंबईतल्या फूटओव्हर ब्रिजची माहिती देण्यात आली होती. याकडे सरकारने दुर्लक्ष केले का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता रेल्वेवरील सर्वच पुलांचे पुन्हा ऑडिट करून राज्य सरकराने श्वेत पत्रिका काढावी, असे ते म्हणाले.
मुंबई समुद्र किनाऱ्यावरील शहर आहे. वातावरणाचा धातूच्या बांधकामावर विपरीत परिणाम होत असतो. परदेशात लोखंडावर काही विशिष्ट सोल्युशन लावण्यात येते. मात्र, आपल्याकडे तशी उपाययोजना होता नसल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर नाशिक ते अहमदाबाद मार्गावरील कोपरी जवळील पूल धोकादायक असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कोपरी पुलाच्या खालील गांजलेले लोखंडाचे गर्डरचे फोटोही दाखवले.