बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीविषयी आणि अजित पवारांबद्दल शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलंय. अजित पवार आमचेच नेते आहेत, काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायचं कारण नाही, असं शरद पवार म्हणालेत. यावरुन राजकारणात खळबळ उडालीय. शरद पवार यांच्या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये नेमकं काय चाललंय, असा प्रश्न उपस्थित होतोय.
अर्थ काढा : दरम्यान शरद पवार यांच्या या विधानानंतर राजकीय नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपामधील नेते एकमेकांना शरद पवारांच्या विधानांचा अर्थ काढण्याचा सल्ला देत आहेत. शरद पवारांच्या विधानावर राजकीय नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काँग्रेसने शरद पवारांच्या विधानाचा अर्थ काढावा, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. त्याला काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.
काँग्रेसने शरद पवार यांच्या वक्तव्याचा अर्थ काढावा. यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी याचा अर्थ काढावा. शरद पवार बोलत असतील तर याचा अर्थ आम्ही का काढावा. शरद पवार महाविकास आघाडीसोबत आहेत. भाजपाने राजकारण सडवलंय. जनतेचा विश्वासघात या सर्वांनी केलेला आहे. यांची जागा वेळप्रसंगी जनता दाखवेल. महाविकास आघाडी म्हणून जे आमच्या सोबत आहेत, ते आमच्या सोबत आहेत. - विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, काँग्रेस
रणनीतीचा भाग असेल : शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय हे सांगता येणार नाही. उद्या त्यांच्या पक्षाच्या फुटीचे प्रकरण निवडणूक आयोगात जाईल, कोर्टात जाईल. त्यामुळे तो त्यांच्या रणनीतीचा भाग असू शकतो. आमच्या पक्षात फूट पडलेली नाही हे जाहीररीत्या सांगावे, असंही वडेट्टीवार म्हणालेत. प्रत्येक पक्षाला आपापल्या परीने तयारी करावी लागते. निवडणुकीमध्ये असे प्रसंग येतात की शेवटच्या टप्प्यामध्ये आघाडी तुटते. त्यासाठी प्रत्येक पक्षाला रणनीती तयार ठेवावी लागते. इंडिया आघाडीच्या पाठीमागे जनता उभी आहे. या सरकारची लोकप्रियता संपली आहे. हे सरकार ईडी, सीबीआयच्या जोरावर चालणारे सरकार असल्याचंही ते म्हणाले.
माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर : शरद पवारांनी न्यायालयीन लढ्यासाठी वक्तव्य केले असले तरी त्याचा न्यायालयीन लढ्यात फरक पडणार नाही. कारण, न्यायालयात आकडेवारी आणि वस्तुस्थिती महत्त्वाची असते. मात्र ज्यांच्या जीवावर राजकारण सुरू आहे. कार्यकर्त्यांनी काय समजायचं? पंतप्रधान मोदींना पाठिंबा असल्याचं कार्यकर्त्यांना एकदाच सांगून टाका. आम्हालाही बरं वाटेल. जनतेला आणि मतदारांना का गृहित धरायचे. आजपर्यंत शरद पवार यांचं राजकारण संभ्रमित करणारं राहिलयं. लोकांना काय दाखवायचं आहे? मोदींना समर्थन असल्याचे सांगा. विरोधीपक्षांची आघाडी असलेल्या इंडियानं काय समजायचं?
चंद्रशेखर बावनकुळे : शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिलीय. केंद्र सरकारचं काम पाहून शरद पवारांचं मनपरिवर्तन होईल. थोड्याच दिवसांत शरद पवार आणि सुप्रिया सुळेदेखील मोदी सरकारला पाठिंबा देतील. त्यामुळे याचीही तयारी विरोधकांनी करुन ठेवावी असा सल्ला बावनकुळे यांनी दिलाय.
हेही वाचा-